esakal | 'लॉकडाऊन लादणे आम्हाला मान्य नाही, शासनाचा एकतर्फी आदेश आमच्यावर उपासमारीची वेळ आणणारा'

बोलून बातमी शोधा

Aurangabad Lock Down News

शासनाने ना वीज बिल माफ केले, ना कोणत्या करात सूट दिली. तरीही शासन एकतर्फी लॉकडाऊन लादणार असेल तर आमचे व्यवसाय बुडणार हे निश्चित आहे.

'लॉकडाऊन लादणे आम्हाला मान्य नाही, शासनाचा एकतर्फी आदेश आमच्यावर उपासमारीची वेळ आणणारा'
sakal_logo
By
अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, एकमेकांपासून अंतर, सॅनिटायझर अशा त्रिसूत्री उपायांचा अवलंब करत बाजारपेठ सुरू असताना अचानक पंचवीस दिवसांचा लॉकडाऊन लादणे आम्हाला मान्य नाही. आम्ही नियम पाळतोच मग शासनाचा एकतर्फी आदेश आमच्यावर उपासमारीची वेळ आणणारा असून बाजारपेठ सुरू राहू द्या. किमान सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत पाच तासांची मोकळीक द्यावी जेणेकरून व्यवसाय, व्यवहार होईल आणि उदरनिर्वाह करता येईल, अशी भावनिक हाक व्यापाऱ्यांनी दिली. लासूर स्टेशन (ता.गंगापूर) या जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पोलिस चौकीत धाव घेत पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन शासनापर्यंत आमच्या भावना पोचवण्याचे आवाहन केले.

डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  

कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे अचानक रात्री शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापने बंद राहणार असे लॉकडाऊनचे आदेश काढले आणि सकाळी बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. गेल्या वर्षी अनभिज्ञ असा हा जीवघेणा आजार नवा होता. त्यामुळे जनसामान्यांत भीती होती, तर आरोग्य यंत्रणाही सज्ज नव्हती. तेव्हा लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता. परंतु आता कोविड प्रतिबंधक लस निघाली व मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. तरीही प्रतिबंधक नियमाची अंमलबजावणी करण्याऐवजी शासनाने सरसकट बाजारपेठ बंद ठेवायला सांगणे आम्हा व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारे आहे. मागील वर्षात मोठे नुकसान झाले होते.

'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?

आताही कोरोनाच्या संसर्ग लाटेचा संदर्भ देऊन शासनाने केलेला लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही. आम्हाला गेल्या वर्षात दुकानभाडे, वीजबिल, जीएसटीसह विविध कर, कर्जाची परतफेड करावीच लागली. यात शासनाने ना वीज बिल माफ केले, ना कोणत्या करात सूट दिली. तरीही शासन एकतर्फी लॉकडाऊन लादणार असेल तर आमचे व्यवसाय बुडणार हे निश्चित आहे. अगोदरच महागाई वाढली असून खर्चाचा ताळमेळ बसत नसताना लॉकडाऊन लावल्यास व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तळमळीने सांगत होते. त्यामुळे आता बंद करण्याऐवजी काही निर्बंध लावून नियम पाळत व्यापार सुरू ठेवायला पाहिजे, अस मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. 

वैजापूर तालुक्यात गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक, महिला होरपळून जखमी 


नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांनुसार बाजारपेठ पूर्ण बंद न करता सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने उघडू द्यावी किंवा एक दिवसआड दुकान उघडणे असे काही निर्बंध लावून व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. सकाळपासून शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ताळेबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना आवाहन केले होते.

संपादन - गणेश पिटेकर