औरंगाबादहून पुणे 'सव्वा' तासात!

दहा हजार कोटींच्या द्रुतगती महामार्गाची गडकरींकडून घोषणा
Pune expressway ten thousand crore Nitin Gadkari announces
Pune expressway ten thousand crore Nitin Gadkari announcessakal

औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे दरम्यान नव्या द्रुतगती महामार्गाची घोषणा करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादसह मराठवाडावासीयांना रविवारी खूशखबर दिली. दहा हजार कोटी रुपये खर्चून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाईल. तो पूर्ण झाल्यावर औरंगाबादहून केवळ सव्वा तासातच पुणे गाठता येईल, असे त्यांनी सांगितले. सध्या येथून पुण्याला जाण्यासाठी सुमारे सहा तास लागतात.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून साडेचारशे किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आहेत. अन्य अनेक प्रकल्पही सुरू आहे. त्यात आता या द्रुतगती महामार्गाची भर पडेल, असे गडकरी म्हणाले. चौपदरीकरण झालेल्या धुळे-सोलापूर महामार्गाच्या (क्रमांक-५२) सोलापूर ते कन्नड हा टप्पा, नूतनीकरण झालेल्या नगरनाका ते केंब्रिज स्कूलपर्यंतचा मार्गाचे लोकार्पण, औरंगाबाद - पैठण मार्गाचे चौपदरीकरण, दौलताबाद ते माळीवाडा, देवगाव रंगारी ते शिऊर, चिखली-दाभाडी-तळेगाव ते पाल फाटा या मार्गाचे काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते येथे झाले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, अंबादास दानवे, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, प्रशांत बंब, नारायण कुचे, भाजपच्या नेत्या विजया रहाटकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, औरंगाबाद-पुणे द्रुतगती महामार्गामुळे औरंगाबादकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटेल. पुढच्या वेळी या महामार्गाच्या भूमिपूजनासाठी येईन. जिल्ह्यात आगामी काळात २५ हजार कोटींच्या रस्त्यांचे काम सुरू करणार आहे. २०२४ पर्यंत मराठवाड्यातील सगळे रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांच्या दर्जाचे होणार आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी-चारचाकी ते हवेत उडणाऱ्या कार आणि धरणात उतरणारे विमान आदी अनेक गोष्टींचा उल्लेख त्यांनी भाषणात केला.

शेंद्रा- वाळूज अखंड उड्डाणपूल

आमचा व मेट्रो विभागात शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसीदरम्यान अखंड उड्डाणपूल तयार करीत आहे. २५ किलोमीटरच्या या मार्गावर चार लेन, नऊ किलोमीटरवर डबल डेकर ब्रिजचा समावेश असेल.शेंद्रा ते चिकलठाणा चार लेन, साडेसात किलोमीटरचा चार लेन रस्ता, उड्डाणपूर राहील. चिकलठाणा ते क्रांती चौकापर्यंत ८.३ किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल असेल. त्याखाली चार लेनचा रस्ता राहील. त्यानंतर क्रांती चौक ते वाळूजदरम्यान उड्डाणपूल, त्याखाली चार लेनचा रस्ता असेल. याचा डीपीआर तयार करीत असून यासाठी चार हजार कोटी रुपये खर्च येणार आहे, असे गडकरी म्हणाले.

मेट्रोच्या डीपीआरचे काम सुरू

मेट्रोच्या डीपीआरचे काम सुरू आहे. दोन कॉरिडॉरमध्ये मेट्रो असेल. पहिल्या कॉरिडॉरमध्ये चिकलठाणा - क्रांती चौक- रेल्वे स्टेशन तर दुसऱ्या कॉरिडॉरमध्ये रेल्वेस्टेशन - हर्सूल टी पॉइंट - सिडको बसस्थानक असा १२ किलोमीटरचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे औरंगाबादचे चित्रच बदलेल. अखंड पूल आणि मेट्रो प्रकल्पास सहा हजार कोटींचा खर्च येणार असल्याचेही गडकरी म्हणाले.

विभागीय हवाई जोडणीसाठी प्रयत्न

औरंगाबाद विमानतळ मोठे आहे. मात्र इथे विमानसेवा कमी झाली आहे. यामुळे आगामी काळात विभागीय हवाई जोडणी म्हणजेच औरंगाबाद ते नागपूर, सोलापूर, जळगावसह राज्यातील अन्य जिल्हे तसेच इंदूरशी हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात औरंगाबाद - पुणे द्रुतगर्ती मार्ग

  • बीड, पैठण, नगर भागातून जाणार

  • मार्गाचा आराखडा पूर्ण

  • कुठेही थांबा नसणार

  • वाहनाचा वेग १४० किलोमीटर प्रतितास शक्य

  • वेळेची मोठी बचत होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com