
औरंगाबाद : मुदतवाढीनंतरही तब्बल दीड हजार जागा रिक्तच
औरंगाबाद : बालकांचा मोफत आणि शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) सुरू असलेली पहिल्या फेरी मंगळवारी संपली. मुदतवाढ देवूनही कागदपत्रांची प्रक्रिया, नियम व अटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ६५ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता मुदतवाढ न देता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी द्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ५७५ शाळांमधील ४ हजार ३०१ जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत ४ हजार १९३ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यात दोन वेळा मुदतवाढ देवूनही केवळ २ हजार ६४२ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत; तर १ हजार ५५१ जागा रिक्त राहील्या आहेत. यंदा प्रवेशासाठी जागांच्या तब्बल चौपट म्हणजे १७ हजार २२१ अर्ज आले होते. मात्र, सोडतीनंतर प्रवेशनिश्चितीकडे पालकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती आरटीई समन्वयक देत आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशासाठी झुंबड उडालेली असताना दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश निश्चितीसाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. दोन वेळा मुदतवाढ दिल्यामुळे प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी, अशी मागणी पालक करीत आहेत.
आकडे बोलतात
एकूण आरटीई पात्र शाळा ः ५७५
एकूण जागा ः ४३०१
एकूण अर्ज ः १७२२१
प्रथम सोडत ः ४१९३
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश ः २६४२
पहिल्या फेरीनंतर रिक्त जागा ः १५५१
Web Title: Aurangabad Rte Students Only 65 Of Admissions Confirmed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..