esakal | औरंगाबाद : ‘व्हायरल’ चा डोक्याला ताप!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

औरंगाबाद : ‘व्हायरल’ चा डोक्याला ताप!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात साथीच्या रोगाचे थैमान सुरूच असून, ताप, डेंगी, चिकनगुण्या, मलेरियाच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कोरोनासह (Corona) मलेरिया, डेंगी (Dengue), चिकनगुण्याची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही रुग्णाच्या अंगातील ताप चार-पाच दिवस उतरत नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंगी, चिकनगुण्यासह साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश दवाखाने फुल्ल आहेत. त्यात आता व्हायरलच्या तापाने अनेक जण फणफणत आहेत. व्हायरलचा अंगातील ताप शंभरपेक्षा अधिक नोंदला जात असून, तो तीन-चार दिवस उतरत नसल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, डॉक्टर तापाच्या रुग्णांना कोरोनासह मलेरिया, चिकुनगुण्या, डेंगीची चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरही अंगातील ताप उतरत नसल्याने डॉक्टरांनाही नेमका ताप कशाचा? हे शोधणे अवघड होत आहे. शहरात साडेपाचशेपेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. त्यातील बहुतांश रुग्णालयात तापाचे रुग्ण दाखल आहेत. अनेक ठिकाणी उपलब्ध बेड कमी पडत आहेत. स्पेशल रूममध्ये दोन ते तीन बेडची व्यवस्था करून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : गुंठेवारीसाठी महिनाभर मुदतवाढ

यासंदर्भात ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे यांनी सांगितले, की सध्या प्रामुख्याने डेंगी, चिकनगुण्यासह श्‍वसन विकाराचे रुग्ण संख्येने वाढले आहेत. दोन वर्षाच्या आतील मुलांना सर्दी, खोकला ताप, श्‍वास घ्यायला त्रास होतो, हे रेस्पीरेटरी व्हायरस आहेत. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात हे रूग्ण वाढतात. पण वातावरण बदलाने म्हणा किंवा इतर काही कारणांनी, असे रूग्ण पावसाळ्यातच वाढले आहेत. शिवाय ‘आरएसव्ही’मुळे एक वर्षाच्या आतल्या मुलांना जास्त संसर्ग होतोय. दम लागणे, खोकला, न्यूमोनियाची चिन्हे दिसणे अशात मुलांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. फ्लूचा प्रादुर्भाव तर आहेच. पावसाळ्यात तो होतो, पण यावेळी तो वाढलाय. एकूणच नॉन कोरोना व्हायरसचाही संसर्ग वाढलेला आहे. यात डेंगी गंभीर आहे. तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, थकवा, चेहरा हातपाय लाल होणे ही डेंगीची काही लक्षणे आहेत. यात ताप कमी झाल्यावर जास्त लक्ष ठेवावे लागते. चिकनगुण्यात मात्र ताप, अंगदुखी असताना जास्त लक्ष ठेवावे लागते.

हेही वाचा: कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी 20 टक्क्यांनी वाढली मागणी

शहरात तापाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. मलेरिया, डेंगी, चिकनगुण्या या साथीच्या रुग्णांची संख्या तर आहेच शिवाय व्हायरल तापाची साथ जोरात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने उपचार घ्यावेत.

-डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

loading image
go to top