esakal | Aurangabad: नळांना मीटर अन् सिग्नल होणार स्मार्ट
sakal

बोलून बातमी शोधा

नळांना मीटर अन् सिग्नल होणार स्मार्ट

औरंगाबाद : नळांना मीटर अन् सिग्नल होणार स्मार्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानासाठी ८१ लाख रुपये खर्च करून पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. १२) झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील पाच हजार व्यावसायिक नळांना मीटर बसविण्यासह इतर विषयांना स्मार्ट सिटीचे मेंटॉर बलदेव सिंह यांनी मंजुरी दिली.

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक मेंटॉर बलदेवसिंह यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ताजमध्ये मंगळवारी घेण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम्, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत स्मार्ट सिटी अभियानातील अधिकाऱ्यांसाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास बलदेवसिंह यांनी मंजुरी दिली. तसेच स्मार्ट सिटीच्या कार्यालयात उभारण्यात येणाऱ्या ओसीसी सेंटरसाठी ८४ लाख रुपये खर्च करून सोलर पॅनेल बसविण्याच्या विषयाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा: लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

संत एकनाथ रंगमंदिरासाठी प्रकाशयोजनेचे काम ९० लाख रुपये खर्च करून स्मार्ट सिटीतून करण्यात आले आहे. त्याला बैठकीत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. स्मार्ट बसच्या स्वच्छतेसाठी निविदा अंतिम करण्यास, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात लावण्यात आलेल्या डिस्प्लेवर जाहिराती करण्यास मंजुरी देण्यात आली. १० डिस्प्ले बोर्ड हे ऑरिसिटीसाठी दिले जाणार आहेत. लाइट हाऊस प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधून नियोजन करावे. महेमूद दरवाजाच्या दुरुस्तीसाठी आपल्या स्तरावर निर्णय घ्या, अशा सूचना बलदेव सिंग यांनी बैठकीत केल्या.

स्मार्ट रोड, स्कूल, हेल्थसेंटरवर खर्च होणार तब्बल ३०० कोटी

महापालिकेसाठी स्मार्ट रोड, स्मार्ट स्कूल, स्मार्ट हेल्थ सेंटर हे प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यावर सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट सिटीत महापालिकेचा २५० कोटींचा हिस्सा असून, यातून ही कामे करण्याचा संकल्प आहे. मात्र, या प्रकल्पातून नागरिकांना प्रत्यक्षात काय फायदा होणार आहे? याचे सादरीकरण करण्याच्या सूचना बलदेवसिंह यांनी बैठकीत केल्या.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

व्यावसायिक नळांच्या मीटरसाठी निविदा

स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील व्यावसायिक नळांना मिटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यामुळे आता निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. पाच हजार नळांना मीटर बसविले जाणार असून, निविदेची किंमत १३ कोटी १६ लाख रुपये एवढी आहे.

घाई गडबडीत उरकली बैठक

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक होणार याविषयी नेहमी स्मार्ट सिटीकडून माहिती दिली जाते. मात्र यावेळी कुठलीही माहिती देण्यात आली नाही. तसेच बैठका डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातील सभागृहात घेतल्या जातात. यावेळी पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तीन रस्त्यांवर २५ स्मार्ट सिग्नल

मुंबईच्या धर्तीवर शहरात स्मार्ट सिग्नल बसविण्याचा निर्णय आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला होता. त्यानुसार हायकोर्टाजवळ एक सिग्नल बसविण्यात आला आहे. आता नगर नाका ते केंब्रीज, सिडको ते हर्सूल, रेल्वेस्टेशन ते हर्सूल या रस्त्यावर २५ ठिकाणी स्मार्ट सिग्नल लावण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यावर ७९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

loading image
go to top