Beed: जिंकणार कोण याऐवजी लढणार कसे? याची उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीड नगर पालिका

बीड : जिंकणार कोण याऐवजी लढणार कसे? याची उत्सुकता

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड, ता. १२ : नगर पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच नेत्यांनी तयारीचे रणशिंग फुंकले आहे. जिंकण्याची कोणाला अधिक तर कोणाला कमी संधी आहे. मात्र, निवडणूक जिंकणार कोण? यापेक्षा लढविली कशी जाणार? याचीच उत्सुकता बीडकरांना लागली आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि युती असली तरी बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक राजकारणामुळे ना आघाडी शक्य आहे ना युती. पण, शिवसेना आघाडीसोबत नसली तरी स्वतंत्र लढणार का? क्षीरसागर नेमके कोणत्या चिन्हावर लढणार? असा प्रश्न आहे. तसेच भाजप - शिवसंग्रामची युतीही अगदी अशक्य मानली जात आहे. स्वतंत्र लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसचे काय? असाही प्रश्नच आहे.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

बीड नगर पालिकेवर अनेक वर्षांपासून जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेली पालिका क्षीरसागर बंधूंच्या पक्षांतरामुळे शिवसेनेच्या ताब्यात असल्याचे सध्यातरी मानले जाते. पण, आगामी निवडणुकीत क्षीरसागर बंधू शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, याबाबत साशंकता आहे. शहरातील सामाजिक रचनेमुळे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याऐवजी आघाडी करावी, असा प्रस्ताव त्यांच्याकडून पक्षाला सुचविला गेला होता. मात्र, चिन्हावरच लढा, असा पक्षादेश शिवसेनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी सोडला आहे. आता श्रेष्ठींनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला तर ठिक नाही तरी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेच आघाडीचाच पर्याय काढतील अशी माहिती आहे.

त्यांनी निवडणूक आयोगाकडे आघाडीची नोंदणी केल्याचीही माहिती आहे. मात्र, डॉ. क्षीरसागर यांनी आघाडीचा पर्याय काढला तर जयदत्त क्षीरसागर काय करणार? असाही मुद्दा आहे. मात्र, काही जागा शिवसेनेच्या चिन्हावर आणि काही जागी आघाडी असाही विजयाचे गणित बांधून शिवसेना व क्षीरसागर यांच्यात समझोता होऊ शकतो. त्यात जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. आमदार संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी लढणार हे निश्चित आहे. मात्र, शिवसेनेसोबत ते आघाडी करणारच नाहीत हेही निश्चित असले तरी काँग्रेसला ते किती वाटा देणार हेही महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून फुटलेल्या काही नेत्यांच्या प्रभागांत ते पायाभरणी कशी करणार, त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला साथीला घेणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. दरम्यान, त्यांच्यापासून दुरावलेल्यांची ओढ मोठ्या क्षीरसागरांकडेच अधिक आहे.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

भाजपला मोठी तयारी करावी लागणार

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनीही निवडणुकीच्या दृष्टीने बीडवर लक्ष केंद्रित केले आहे. मागच्या काही दिवसांत त्यांचा बीड मुक्काम आणि भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. मात्र, राज्यातील त्यांच्या पक्षाचा मोठा भाऊ भाजप मात्र जिल्ह्यात त्यांच्या पक्षाला जवळ करत नाही. त्यामुळे त्यांना अकेला चलोरे करावे लागणार आहे. भाजपच्या जिल्हा संघटनेतील बदलानंतर व राज्यातील सत्तासमिकरणांच्या बदलानंतर आता पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाजपला मोठी तयारी करावी लागणार आहे.

पालिका निवडणुकीत क्षीरसागरांना सोबत घ्यावे, असा पर्याय भाजपमधील काही मंडळींनी समोर आणला आहे. मात्र, आता त्यांना सोबत घेतले तर विधानसभेच्या उमेदवारीचा पेच आतापासूनच सुरु होणार यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून ‘हो - ना’ सुरु आहे. मागच्या निवडणुकीत लक्षवेधी यश मिळविणाऱ्या एमआयएमनेही आंदोलनांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. तर, वंचित आघाडी व आपची देखील सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणुकीच्या दृष्टीने आरोपांची राळ सुरु आहे.

loading image
go to top