काँग्रेसला भाजपने हरविले; पण घायाळ केले राष्ट्रवादीनेच

सुरुवातीच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नंबर वन पक्ष होता.
beed
beedsakal

बीड : जिल्ह्यात काँग्रेसला जरी भाजपने हरविले असले तरी सर्वाधिक घायाळा करण्याचे डाव राष्ट्रवादीनेच टाकले आहेत. आता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी देखील राष्ट्रवादीमय झाले आहेत.

सुरुवातीच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नंबर वन पक्ष होता. त्याकाळी डावे व शेतकरी पक्ष काँग्रेस विरोधक असतं. पुढे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय उदय झाला आणि काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे आला. त्या काळात देखील काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपची साथ दिली. परंतु, नंतरही जिल्ह्यातील दोन प्रमुख पक्षांत काँग्रेस प्रमुख एक पक्ष होताच. म्हणजे भाजपकडून निवडणुकांत हार होत असली तरी लढणारा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस होताच. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसची उतरती कळा सुरु झाली. अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उर्वरित नेत्यांमध्ये गटबाजी झाली. त्यात १९९९ ते २०१४ या काळात तत्कालीन आघाडीचे सरकार असले तरी पालकमंत्री राष्ट्रवादीचा असे. त्यामुळे राज्यात काँग्रेस मोठा भाऊ असला तरी जिल्ह्यातील काँग्रेसला कायम राष्ट्रवादीच्याच ‘हाता’कडे पाहावे लागे.

वरील काळातील तीन निवडणुकांपैकी दोन निवडणुका या पक्षाने आघाडी करून लढविल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या हिश्शात राष्ट्रवादीने ‘हात’ मारला. सहापैकी एकमेव परळी मतदार संघ काँग्रेससाठी शिल्लक होता. त्यातही मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या वाट्याची एकमेव जागा देखील तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी स्वत:ला सोडवून घेतली. त्या बदल्यात जिल्ह्यातील दुसरी जागाही काँग्रेसला दिली नाही. अगदी केंद्रीय काँग्रेसमध्ये काम करणारे रवींद्र दळवी केजसाठी इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी दिली नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकही जागा लढविली नाही असा बीड एकमेव जिल्हा असावा.

धनंजय मुंडे यांच्या विजयात मदत व परळीची जागा देण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसचे संजय दौंड यांना धनंजय मुंडे यांच्या जागी विधान परिषदेवर घेतले खरे पण राष्ट्रवादीच्या कोट्यातून. त्यामुळे दौंड देखील अगोदरच राष्ट्रवादीमय झाले. आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजकिशोर मोदी यांनी देखील काँग्रेस सोडत असून राष्ट्रवादीतच प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद निश्चित वाढणार असली तरी ती पोकळी भरून काढणे काँग्रेसला तेवढ्या प्रमाणात शक्य होणार नाही.

beed
Covid19: राज्यात 39 मृत्यू, तर 1573 नव्या रुग्णांची भर 

पक्षांतर्गत गटबाजीही मुख्य कारण

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कायम निमंत्रीत सदस्या व जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील यांना पक्षाने नुकतीच राज्यसभा दिली आहे. त्यामुळे पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढेल असे मानले जात असतानाच पहिला झटका मोदींच्या रूपाने बसला आहे. यापूर्वीही त्यांच्यासह इतरांना पक्षाने पदे दिली. परंतु, पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढली नाही. आता जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख जिल्हाभर फिरत आहेत. प्रतिसादही भेटत असला तरी पक्षसंघटन वाढीत याचा किती उपयोग होणार? ते पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com