Chhatrapati sambhajinagar : नामांतराच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा Chhatrapati sambhajinagar MNS march support name change | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे

Chhatrapati sambhajinagar : नामांतराच्या समर्थनार्थ मनसेचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता.१६) शहरातील संस्थान गणपती राजाबाजार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘स्वप्नपूर्ती’ विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून गेला.

दरम्यान, मोर्चाला पोलिसांची परवानगी दिली नसल्याने शहागंज परिसरातच पोलिसांनी हा मोर्चा रोखला व कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भर पावसात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकारातून १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. जलील यांच्या नामांतरविरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्यावतीने गुरुवारी शहरात स्वप्नपूर्ती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यानुसार सकाळी राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. दुपारी १ वाजता मोर्चा निघताच पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. शहागंज परिसरातच हा मोर्चा रोखण्यात आला. यावेळी पोलिस आणि मनसैनिकांमध्ये वाद, बाचाबाची झाली.

मोर्चात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी, वैभव मिटकर, बिपिन नाईक, गजानन गौडा पाटील, आशीष सुरडकर, अनिकेत निल्लावार,

अशोक पवार, अमेय देशपांडे, प्रशांत जोशी, नूतन जयस्वाल, लीला राजपूत, सपना ढगे, मोनू तुसे, विकी जाधव यांच्यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, हिंदुत्ववादी सरकार असून आम्हाला ताब्यात घेताय? जो औरंगजेब औरंगजेब करतोय, त्याला आधी ताब्यात घ्या, त्याला अटक करा, अशा इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

शासनाने कायदेशीररीत्या शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नाव केले. मात्र महाराष्ट्र व देशवासीयांचे दैवत असलेल्या छत्रपती संभाजीराजांच्या नावाला विरोध केला जातोय. खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या नावाच्या समर्थनात काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखले, याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

- सुमीत खांबेकर, जिल्हाध्यक्ष

छत्रपती संभाजीनगर ः मोर्चाकरत्यांना ताब्यात घेण्यासाठी तीन पोलिस व्हॅन बोलविण्यात आल्या होत्या. त्या व्हॅन क्रांती चौक पोलिसांत गेल्या त्या परत आल्याच नाहीत. यावेळी कार्यकर्त्यांना थांबविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. मग मिळेल त्या वाहनामध्ये कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यासाठी पोलिस चालकांना प्रशिक्षण देणारी गाडी बोलविण्यात आली होती.

मोर्चासाठी मनसेने ७ ते ८ दिवसांपूर्वीच परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारली. एकीकडे एमआयएमच्या कँडल मार्चला परवानगी दिली होती, पण आमची परवानगी का नाकारली? शहरवासीयांचे नामांतराचे स्वप्न साकार झाल्याने मनसेने या मोर्चाला स्वप्नपूर्ती असे नाव दिले होते. मात्र, शहागंज परिसरात मनसेचा हा विराट मोर्चा रोखण्यात आला. आम्ही आनंददेखील साजरा करू शकत नाहीत का?.

प्रकाश महाजन, मनसे नेते