

Chhatrapati Sambhajinagar Crime
esakal
छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाकडून जामीन मिळताच फटाक्यांची आतषबाजी... चार गाड्यांचा ताफा... कारच्या सनरूफमधून आरोपी बाहेर येत शक्तिप्रदर्शन आणि काही तासांतच या जल्लोषाची ‘किंग इज बॅक’ म्हणत सोशल मीडियावर झळकलेली रील जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगारासह एका टोळक्याला चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी सराईत आरोपी सचिन अण्णा कुसाळकर याच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अमोल अंभोरे (वय ३४) यांनी फिर्याद दिली. त्यावरून सचिनसह किशोर किसन क्षत्रिय, चेतन जालिंदर गुंजाळ, सचिन काळे, अनिल केदार, अमोल धनवट, भरत गायके, गंगा निकम, गणेश काळे, दिनेश धायडे, जगदीश खरातकर आणि त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका अपहरणाच्या गुन्ह्यात सचिन कुसाळकर हा तीन महिन्यांपासून कारागृहात होता. न्यायालयाकडून त्याला नुकताच अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी दुपारी एन-७ सिडको भागातील रामलीला मैदानासमोरील मुख्य रस्त्यावर त्याच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्याचा जाहीर सत्कार केला.
भररस्त्यात फटाके फोडले, सनरूफ कारमधून बाहेर येऊन कुसाळकर याचे शक्तिप्रदर्शन करत चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडिओ चेतन जालिंदर गुंजाळ याने सोशल मीडियावर ‘किंग इज बॅक @ सचिन कुसाळकर’ असे शीर्षक देऊन पोस्ट केला. याची पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करत आहेत.
शक्तिप्रदर्शनासाठी टोळक्याने सार्वजनिक रस्त्यावर वाहने बेदरकारपणे चालवली. यामध्ये काळ्या रंगाची कार (एमएच-२६-, बीसी-५६८६), नंबर नसलेली लाल रंगाची कार, काळ्या रंगाची कार (एमएच-५७-२४२२) आणि लाल रंगाची मोपेड (एमएच-२०, एचई-८६०९) या वाहनांचा वापर करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले. सचिन कुसाळकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचा साथीदार किशोर क्षत्रिय याच्यावरही एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.