

Grishneshwar Temple
esakal
खुलताबाद : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. सध्या गर्दीच्या काळात भाविकांना रांगेत दीड ते दोन तास उभे राहावे लागते. नवीन उभारण्यात येणारी दर्शनवारी आणि भुयारी मार्गामुळे भाविकांची रांगेतील प्रतीक्षा कमी होऊन सुमारे ३० मिनिटांत सुलभ दर्शन घेता येईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था सुरक्षित व सुलभ करण्यासाठी कन्नड-खुलताबाद मुख्य रस्त्याखालून जाणाऱ्या ७५ मीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे प्रत्यक्ष काम बुधवारी (ता. २३) दुपारपासून सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत मार्गातील अतिक्रमणे हटवून जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू झाले.
वाहतुकीवर किमान परिणाम व्हावा आणि काम जलदगतीने व्हावे, यासाठी येथे आधुनिक ‘प्री-कास्ट काँक्रीट बॉक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून भुयारी मार्गाची उभारणी केली जात आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे स्वतः दर आठवड्याला या कामाचा आढावा घेत आहेत.
भुयारी मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी मुख्य कमानीसमोरील बेल-फूल विक्रेत्यांची दुकाने, टपऱ्या तसेच रस्त्यावरील सुमारे ३० दुकानांची अतिक्रमणे बुधवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, या कामामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने खुलताबाद शहराकडे जाण्यासाठी तत्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मंदिर परिसरासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत सुमारे २० एकर क्षेत्रात भाविकांसाठी ३३ प्रकारच्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
विकास आराखड्यात ६५० मीटर लांबीची स्वतंत्र दर्शनवारी उभारण्यात येत आहे. भाविकांना उन्हा-पावसाचा त्रास न होता सुरक्षित दर्शन मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
याचात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कन्नड-खुलताबाद रस्त्याखालून ७५ मीटरचा भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने याला हिरवा कंदील दिला आहे.
"भारतीय पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी दोन महिन्यांत भुयारी मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे."
— दिलीप कोलते, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.