कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे | Corona death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Death
कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे

कोरोना मृतांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे

लातूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. यात लातूर महापालिकेने केलेले अंत्यविधी आणि आरोग्य विभागाकडून देण्यात येणारी मृतांची आकडेवारी यात सातत्याने तफावत दिसत होती. आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत जिवंत व्यक्तींची नावे असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळाचा हा नमुना आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लातूर जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोन हजार चारशेच्या घरात गेला आहे. महापालिकेकडून दररोज केले जाणारे अंत्यविधी व आरोग्य विभागाकडून दिले जाणारे मृतांचे आकडे यात सातत्याने तफावत येत होती. त्यावेळीही आकडेवारीचा सावळा गोंधळ दिसून येत होता. कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना शासनाकडून ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

यासाठी आयसीएमआरची ७२४ मृतांची यादी आरोग्य विभागाने महापालिकेला पाठवली आहे. या यादीत संबंधित कुटुंबांचे मोबाइल क्रमांकही दिले आहेत. यादीत काही नावे शहराच्या परिसरातील गावांतील आहेत. शहरातील मृतांची संख्या ४१० आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधून ऑनलाइन अर्ज भरून घेतला जात आहे. यात कर्मचारी यादीतील मोबाइलवर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत सहा व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले आहे. दोन हजार ४५१ मृतांत आता किती व्यक्ती जिवंत सापडतात, याकडे लक्ष लागले आहे.

दीडशे जणांचा पत्ता लागेना कोरोनाकाळात घर सील होऊ नये म्हणून चुकीचा पत्ता, चुकीचा मोबाइल नंबर देण्याचे प्रकार नागरिकांकडून घडल्याचे आता समोर येत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधताना आतापर्यंत शहरातील दीडशे नातेवाइकांचा पत्ताच लागत नसल्याचेही समोर आले आहे.

पाच कुटुंबीयांनी नाकारली मदत

महापालिका कर्मचाऱ्याकडून मृतांच्या वारसाची माहिती घेतली जात आहे. यात एकापेक्षा अधिक वारस असतील तर त्यांच्याकडून संमतिपत्र, एक रद्द केलेला धनादेश, पासबुकाची सत्यप्रत, आधारकार्डही घेतले जात आहे. पण शहरातील पाच कुटुंबीयांनी शासनाची मदत नाकारली असून अर्ज भरून देण्यासही नकार दिल्याचे समोर आले आहे.