esakal | Corona : शहराचे हाॅटस्पाॅट बदलले, तीन नव्या भागात रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड म्हणाल्या, ती ज्या तीन नवीन वसाहतींतून कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत, त्या वसाहती सोमवारी सील करण्यात आल्या. नव्याच भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. 

Corona : शहराचे हाॅटस्पाॅट बदलले, तीन नव्या भागात रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : समतानगर, हिलाल कॉलनी, आसेफिया कॉलनी या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने तिन्ही वसाहतींचा १०० मीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. आरोग्य पथकांकडून सोमवारपासून (ता. २०) सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले व वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. यापूर्वी या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले नव्हते. त्यामुळे कोरोना शहरातील हाॅटस्पाॅट बदलत असल्याचे मानले जात आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी आसेफिया कॉलनीतही वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी समतानगर, हिलाल कॉलनी येथे रुग्ण आढळून आले. हे तीनही रूग्ण नव्याच भागात आढळून आले आहेत. त्यामुळे या भागातही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय व महापालिकेचा आरोग्य विभाग लढा देण्यासाठी सज्ज आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड म्हणाल्या, ती ज्या तीन नवीन वसाहतींतून कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत, त्या वसाहती सोमवारी सील करण्यात आल्या. सध्या कलाग्राममध्ये आठ जण क्‍वॉरंटाइन असून, १३९ जणांना होम क्‍वॉरंटाइन केले असल्याचे डॉ. जोगदंड यांनी स्पष्ट केले. 

सिडको एन-चार, सातारा, देवळाई कोरोनामुक्‍त 
सिडको एन-चार, सातारा आणि देवळाई परिसरात आढळलेले रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्‍त झाले आहे. विशेष म्हणजे, या भागात गेल्या चौदा दिवसात इतरांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे आता या भागातील सर्व्हे बंद करण्यात आला आहे. इतर नऊ वसाहतीमध्ये मात्र दररोज सर्व्हे केला जात आहे. सोमवारी या भागात १०३ आरोग्य पथकांनी सहा हजार १५५ घरांचा सर्व्हे करून २९ हजार ४५१ जणांची तपासणी केल्याचे डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. 

पुणे, मुंबईहून येणाऱ्यांना करणार क्‍वॉरंटाइन 
कोरोनाच्या रेडझोनमधून येणाऱ्यांना १४ दिवस क्‍वॉरंटाइन करूनच घरी जाण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात पुणे, मुंबईसह कोरोनाग्रस्त भागांतून येणाऱ्या‍ प्रवाशांना पूर्ण खात्री करूनच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना क्‍वॉरंटाईन केले जाईल, असे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा