esakal | Corona: पहिल्या दिवशी 'पॉझिटिव्ह' तर दुसऱ्या दिवशी 'निगेटिव्ह’; रुग्णांच्या मनात धास्ती

बोलून बातमी शोधा

corona report
Corona: पहिल्या दिवशी 'पॉझिटिव्ह' तर दुसऱ्या दिवशी 'निगेटिव्ह’; रुग्णांच्या मनात धास्ती
sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): कोरोना चाचण्यांत घोळ असल्याने रुग्णांच्या हृदयाची ठोके दिवस-दिवस वाढत असल्याचे दिसत आहे. पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात पहिल्या दिवशी अहवाल "पॉझिटिव्ह" निघाल्यानंतर त्याच रुग्णाने दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता अहवाल मात्र "निगेटिव्ह" आल्याने या रुग्णाला धक्काच बसला आहे. अशा बदलत्या अहवालांमुळे रुग्ण संभ्रमात पडले आहे.

पाचोड येथील व्यापारी राहुल नारळे हे दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले होते. त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेतली. लस घेऊन चाळीस दिवस उलटल्यानंतर ते दुसरी लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले असता त्यांनी आपल्या संपूर्ण कुंटूबियांची कोरोना चाचणी करायचे ठरवले. त्यांनी पत्नी संजिवनी नारळे यांची मंगळवारी (ता.२०) ‘आर.टी.पी. सी.आर.’ चाचणीसाठी नमुने दिले. बुधवारी (ता.२१ ) त्यांना पत्नीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह' असल्याचे कळविण्यात आले.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

परंतु त्यांनी घाबरुन न जाता आलेल्या या तपासणी अहवालावर शंका आल्याने त्यांनी दुसऱ्यांदा तपासणी करण्याचे ठरवले, अन् त्यांनी परत येथेच गुरुवारी (ता. २२) अँटिजन टेस्ट केली तर त्याचा अहवाल "निगेटिव्ह" आला. तोच त्यांनी पुन्हा ‘आर.टी.पी.सी.आर.’ चाचणीसाठी रक्त व थुंकीचे नमुने दिले. त्याचा त्याचा अहवाल शुक्रवारी (ता.२३) प्राप्त होऊन तोपण "निगेटिव्ह" आला. त्यामुळे या दोन्ही अहवालांपैकी नेमका खरा अहवाल कोणता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये लसीकरण पुन्हा सुरू, ४० हजार लसी मिळाल्या

राहुल नारळे म्हणाले, 'एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चाचण्यांच्या अहवालातील उलटसुलट या घोळामुळे मोठा धक्का बसला आहे. नेमका यांत काय घोळ आहे, हे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात नाही. आता आम्ही संभ्रामात पडलो आहे. माझ्या पत्नीला कुंटूंबात ठेवावे कि विलगीकरण करावे, आता या दोन्ही अहवालापैकी खरा अहवाल कोणता आहे, हे आम्हाला समजेना'.