esakal | बाजारपेठेतून चिनी पिचकारी, बंदुका गायब
sakal

बोलून बातमी शोधा

holi

बाजारपेठेतून चिनी पिचकारी, बंदुका गायब

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : दरवर्षी होळीला चिनी रंग, पिचकाऱ्या, रंग उडविण्याच्या बंदुका यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते; मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे चिनी पिचकारी आणि बंदुका बाजारात आल्या नाहीत. शिवाय चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर ड्युटी वाढल्यामुळेही बाजारपेठेतून चिनी पिचकारी, बंदुका गायब झाल्या आहेत. परिणामी, भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना ग्राहक पसंती देत आहेत. 

होळीनिमित्त लागणारे रंग, लहान मुलांसाठीच्या पिचकारी, बंदुका खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतात. यंदा कोरोना व्हायरसमुळे बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे गर्दी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कोरोना व्हायरस हा भारतातही आल्यामुळे बाजारपेठेसह मॉलमध्येही नेहमी दिसणारी वर्दळ कमी झाली आहे. बाजारपेठेत दरवर्षी चीनवरून वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारी वॉटर गन, छोटी छत्री, बंदुका विक्रीसाठी येतात; मात्र यंदा होलसेलरने होळीसाठी लागणाऱ्या साहित्याची आयातच केली नाही. त्यामुळे भारतीय बनावटीच्या बंदुका विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. काही दुकानदारांकडून गेल्या वर्षीच्या चायनीज पिचकाऱ्या व बंदुका आहेत, त्या यंदा विक्रीसाठी काढण्यात आलेल्या आहेत. 

हे ही वाचा... येस बँक : एका नगरसेवकाने वाचवले महापालिकेचे २४० कोटी​ 

होळीसाठी लागणाऱ्या ७५ ते ८५ टक्के वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. चिनी वस्तूंची आयात बंद असल्याने होळीसाठी लागणाऱ्या पिचकारी, पाण्याची बंदूक, रंगांच्या किमती वाढल्या आहेत; तसेच कोरोनाच्या भीतीमुळे बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खरेदीची गर्दी नसल्याचे शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितले. चिनी वस्तूंपेक्षा भारतीय मालाची किमत अधिक आहे. त्यामुळे ग्राहकांना यंदा जास्त रक्कम अदा करावी लागत आहे. पिचकाऱ्या, वॉटर गन, छोटी छत्री असलेली बंदूक अशा विविध वस्तू चाळीस रुपयांपासून ते सहाशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. होळीसाठी वापरण्यात येणारा रंग दहा, पंधरा रुपयांच्या पाकिटापासून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंतचे रंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत. 

हे ही वाचा...   अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका!   

दरवर्षी होळीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते; परंतु यंदा कोरोनाच्या धास्तीने नागरिकांनी होळी नकोच म्हणत आहेत. ग्राहक कोरडा रंग घेऊन जात असून, इतर साहित्य खरेदीला नकार देत आहेत. चिनी होळीचे साहित्य यंदा बाजारपेठेतून हद्दपार झाले आहे. सर्वजण स्वदेशी बनावटीचे होळीचे साहित्य विक्री करण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा होळीचे रंग व पिचकारीच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. बाजारातील उलाढाल ५० टक्क्यांनी घटली आहे. 
- माधवराव स्वामी, होलसेल रंग विक्रेता