esakal | ‘ट्रायल’साठी कार घेऊन पळाले...९० किलोमीटर पाठलाग करून ‘सिनेस्टाईल’ पकडले!
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

‘ट्रायल’साठी कार घेऊन पळाले...९० किलोमीटर पाठलाग करून पकडले!

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: ऊसने सहा हजार रुपये देण्यासाठी दोघा मित्रांनी शक्कल लढवली अन् थेट गेले कार खरेदी विक्रीच्या केंद्रावर. तिथून ट्रायल घ्यायची म्हणत कार घेतली खरी, पण कारमध्ये बसल्यानंतर कारसोबत आलेल्या एकाच्या गळ्याला चाकू लावत रस्त्यात उतरुन दिले अन् दोघे मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत कार विक्री करुन उसने पैसे परत करण्याचा दोघांचा इरादा होता. मात्र, गुन्हे शाखेने तब्बल ९० किलोमीटर ‘सिनेस्टाईल’ पाठलाग करुन दोघा आरोपींना कारसहित अटक केली. दुपारी सव्वा एकदरम्यान सुरु झालेला हा थरार साडेतीन वाजता थांबला.

आरोपी फैसल रफीक सय्यद (२४, रा. गल्ली क्र. ८, रहेमानिया कॉलनी) आणि आरोपी सय्यद आरबाज सय्यद आरेफ (रा. रोशन गेट) हे दोघे मित्र आहेत. आरोपी फैसलकडे नारेगावातील फैजान नावाच्या व्यक्तीचे सहा हजार रुपये होते. ते परत करण्यासाठी दोघा मित्रांनी शक्कल लढविली. फैसल याने त्याच्या काकाची स्कूटी (एमएच २०, ईबी २०६) घेतली आणि दोघेही साखरे मंगल कार्यालयाजवळील वैष्णवी मोटर्स येथे गेले. तिथे आम्हाला कार खरेदी करावयाची आहे असे सांगत नामांकित कंपनीची आलिशान कार (एमएच १५ डीसी ३४८८) पाहून घेतली. दरम्यान मोटर्सच्या मालकाला कार आवडल्याचे सांगत ट्रायल घ्यावयाची असल्याचे आरोपींनी सांगितले.

हेही वाचा: Crime News: अहमदपूरमध्ये कीर्तनकाराला मारहाण

...अन् झाले भुर्रर्र-
दोघा आरोपींनी ट्रायलसाठी कार घेतली, मालकाने कारसोबत एक व्यक्ती दिला, असे तिघे कारची ट्रायल घेत घेत जिल्हा न्यायालयापर्यंत आले. दरम्यान फैसल कार चालवत होता तर त्याचा साथीदार आरबाज हा मागे बसला होता. आरबाजने अचानक कारसोबत आलेल्या व्यक्तीच्या गळ्याला चाकू लावत धमकी देऊन खाली उतरविले अन सुसाट वेगाने दोघे मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी आरोपींनी लासूर क्रॉस केल्यानंतर कारच्या नंबरप्लेट तोडून टाकल्या होत्या.

उपनिरीक्षक शेळकेंनी लावली बाजी-
हा प्रकार गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना समजला. आघाव यांनी शेळकेंचे एक पथक आरोपींच्या मागे पाठविले. शेळकेंनी तात्काळ खासगी वाहन काढून पथकासोबत आरोपींचा पाठलाग करायला सुरवात केली. शेळके म्हणाले की, सीसीटीव्हीवरुन आमचे पथक गंगापूर फाट्यावर आल्यानंतर आरोपी लासूरमार्गे जात असल्याची माहिती मिळाली. शेळकेंचे पथक लासूर मार्गाने जात असताना टोल नाक्यावर माहिती घेतली असता, सीसीटीव्हीमध्ये चोरीची कार पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर चौकात सापळा लावण्यात आला.

हेही वाचा: औरंगाबादेत सेंद्रीय शेती आणि देशी गोसंवर्धनातून शेतकऱ्याची प्रगती

सुसाट वेगाने पाठलाग करत शेळके वैजापूर चौकापर्यंत गेल्यानंतर तिथे आरोपी कारमध्ये दिसले. मात्र वेगात आलेले वाहन आपले पाठलाग करत असल्याचे समजताच आरोपींनी वैजापूरमधून कार दामटली. वैजापूरपासून सिनेस्टाईल पाठलाग सुरु झाला. वैजापूरपासून ९ ते १० किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आरोपींची कार पुरणगाव चौफुलीजवळील कार आदळल्याने कारने रस्ता सोडला अन गेली. त्याच दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे चाकूसारखी हत्यारे असतानाही शेळकेंनी जिवाची बाजी लावून ही कारवाई केल्याने पोलिस दलात त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

साहब... वो मेरा भतिजा है-
घटनास्थळावर आरोपींनी त्यांची दुचाकी सोडली होती. घटनेची माहिती मिळताच अविनाश आघाव आणि जिन्सीचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्हीची पाहणी केली. दरम्यान तिथे आढळलेल्या स्कुटीचा नंबर तपासून स्कूटीमालकाला फोन केला. स्कुटीमालकाने ‘साहब वो मेरी स्कुटी है, और वो मेरा भतिजा है’ असे सांगितले. त्यावरुन आरोपी स्पष्ट झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून कार, दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रविंद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव, निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथकप्रमुख उपनिरीक्षक दत्ता शेळके, नंदकुमार भंडारी, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड, किरण गावंडे, ओमप्रकाश बनकर, जिन्सी पोलिस यांनी केली.

हेही वाचा: पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान

काम फत्ते झाल्याची पाठविली ‘सेल्फी’
आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग दुपारी साडेतीन वाजता ९० किलोमीटर अंतरावर संपला. दरम्यान कार खड्ड्यात गेल्याने किरकोळ अपघातानंतर आरोपींना ताब्यात घेतले असून कामगिरी फत्ते झाली आहे, तसेच आरोपी ताब्यात असल्याची आरोपीसोबतची सेल्फी उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी शहर पोलिस दलास पाठविली.

loading image
go to top