
Encroachment Crime : चिमणा राजा हवेलीच्या जागेवरून पुन्हा तणाव; एक गंभीर होताच महापालिकेने थांबविली कारवाई
छत्रपती संभाजीनगर - जामा मशीद परिसरात असलेल्या चिमणा राजा हवेलीच्या जागेवरील बेकायदा बांधकामे हटविण्यावरून गुरुवारी (ता. आठ) पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. महापालिकेने चारही बाजूने रस्ता बंद करून प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुमारे १७ बेकायदा बांधकामे काढली, मात्र दुपारी दोननंतर एका भंगार विक्रेत्याची प्रकृती खालावल्यावर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई थांबविली.
ऐतिहासिक जामा मशीद परिसरात चिमणा राजा यांची दहा ते बारा एकर परिसरात हवेली होती. ही जागा अनेक वर्षांपासून पडून असल्याने त्यातील काही जागेवर घरे बांधण्यात आली आहेत तर उर्वरित जागा अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी २०१२ मध्ये खरेदी केली आहे. अब्दुल समीर अब्दुल सत्तार त्यांच्यातर्फे २०१५ मध्ये अजंता कन्स्ट्रक्शन कंपनीने महापालिकेकडे अर्ज करून या जागेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी परवानगी घेतली.
त्यानंतर २०१६ मध्ये या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी दोन गटात वाद निर्माण झाला. पोलिसांनी चारही बाजूंनी या जागेला संरक्षण दिले होते, पण वादामुळे ही कारवाई थांबविण्यात आली. या हवेलीच्या परिसरातच महापालिकेचे खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच हवेलीच्या बाजूने वीस फूट रुंद रस्ताही दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे अतिक्रमण हटाव विभागाचे पथक गुरुवारी सकाळी सात वाजता या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन दाखल झाले.

दुपारी एकपर्यंत हवेलीच्या जागेवरील लहान मोठी बेकायदा बांधकामे काढण्यात आली. त्यानंतर दुपारी हवेलीच्या जागेवर पाच हजार चौरस फुटाची जागा आमची असल्याचा दावा एका भंगार विक्रेत्याने केला. त्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना पीआर कार्डही दाखविले. या आक्षेपानंतर तणाव निर्माण झाला. संबंधिताला रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने कारवाई थांबविली.
अनेकांनी घेतली न्यायालयात धाव
हवेलीच्या काही जागेवर मालकी हक्क सांगितला जात आहे. असा दावा करणाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली, मात्र खंडपीठाने त्यांना दिवाणी दावा दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिकेने पुढील ४५ दिवस कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश दिले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
अनधिकृत बांधकाम विषयक नियमितरित्या केली जाणारी ही कारवाई होती. याठिकाणी असलेली बांधकामे ही विकास नियंत्रण नियमानुसार नसल्याने याविषयी न्यायालयाचा कुठलाही मनाई हुकूम नव्हता.
- सौरभ जोशी, अतिरिक्त आयुक्त महापालिका.