पिक नुकसानीचा धसका घेत शेतकऱ्याचा मृत्यू, मुलीचे लग्न राहिले | Aurangabad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिगांबर राठोड

पिक नुकसानीचा धसका घेत शेतकऱ्याचा मृत्यू, मुलीचे लग्न राहिले

सोयगाव (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीच्या (Heavy Rain) नुकसानीची दाहकता शेतात पाहूनच आर्थिक विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा नैराश्यातून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.२९) निंबायती (ता.सोयगाव) येथे घडली. या घटनेबाबत तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकुल वातावरणात मृत शेतकऱ्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोयगाव (Soybean) तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. निंबायती येथील शेतकरी डिगांबर रामचंद्र राठोड (वय ४९) यांचे रामपुरा शिवारात शेत आहे. त्यांनी गट क्रमांक-४९ मध्ये व्याजाच्या रक्कमेतून कपाशीची (Aurangabad) लागवड केली होती. परंतु सोमवारी (ता.२७) रात्री आणि मंगळवारी (ता.२८) झालेल्या दोन दिवसांच्या ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या पावसात त्यांचे दोन एकर क्षेत्र पुराच्या पाण्यात कपाशीसह वाहून गेले.

हेही वाचा: वाळूजजवळ ट्रॅव्हल बस-ट्रकचा भीषण अपघात, आठ प्रवासी जखमी

यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले असतांना बुधवारी पावसाने उसंत घेतल्याने डिगांबर राठोड यांनी पहाटे शेतात गेले असता नुकसानीची दाहकता आणि सरसकट वाहून गेलेल्या कपाशी पिकांची अवस्था पाहून अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने घराचा रस्ता धरला व घरी येताच त्यांना घाम आल्याने व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दोन एकर क्षेत्र वाहून गेल्यावर उर्वरित क्षेत्रात कपाशी पिकांची वाताहत झाल्याने डिगांबर राठोड यांना अस्वस्थ वाटू लागले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेतातून घरी येताच त्यांनी कुटुंबियांना शेतातील झालेल्या नुकसानीबाबत प्रचंड मनस्ताप व्यक्त करतच त्याचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकारामुळे सोयगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीच्या नुकसानीचा सोयगाव तालुक्यात पहिला बळी

दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत पिकांचे झालेले नुकसान असाहाय्य झाल्याने निंबायतीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने प्राण सोडला आहे. महिनाभरापूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह होता. परंतु उत्पन्नच हाती येणार नसल्याने मुलीचा विवाह कसा करावा, अशी विवंचना त्यांना लागून होती. त्याच खरिपाच्या पेरणीसाठी लागलेला खर्च कसा काढावा व कर्ज फेडण्याच्या विवंचनेने त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

हेही वाचा: काढणीस आलेली केळीची बाग माथेफिरुने कापली, शेतकरी आर्थिक संकटात

नुकसानीचा व्हिडिओ व्हायरल

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात झालेल्या नुकसानीचा व वाहून गेलेली शेताचा नुकताच मृत शेतकऱ्याच्या मुलाने मंगळवारीच प्रशासनासमोर व्हायरल केला होता. परंतु तरीही काहीच उपयोग झालेला नव्हता. त्यांची शेती वाहून गेल्यावरही त्यांना मदत मिळणार नसल्याचे त्यांच्या मनातील ग्रह पक्का झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Farmer Died Due To Kharip Crops Damage In Soygaon Of Aurangabad District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..