esakal | कोरोना काळातही कडेठाणमधील आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद
sakal

बोलून बातमी शोधा

health center

कोरोना काळातही कडेठाणमधील आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सोमनाथ तवार

कडेठाण (औरंगाबाद): ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोचवण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (health center) इमारती उभ्या केल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांना लाखो रुपयांचे पॅकेज देऊन अशा ठिकाणी नियुक्त्याही दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी सरकारी घरंसुद्धा बांधून दिली आहेत. मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी दवाखान्यांच्या दारात जावं लागतं आणि भरमसाठा खर्चही करावा लागतोय ,कारण याच शासकीय रुग्णालयांची दार कुलूपबंद आहेत.

या उपकेंद्राअंतर्गत कडेठाण खु, कडेठाण बु, राजनगाव दंडगा, गेवराई मर्दा, गेवराई तांडा या गावांचा समावेश होतो. सध्या ताप, सर्दी, खोकला अर्थात कोरोनासदृश (covid 19 symptoms) रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अशा प्रसंगी उपकेंद्र बंद असल्याने जनसामान्यांनी काय करावे हा प्रश्न आहे. सरंपच आणि गावकरी या विरोधात एकवटले असून त्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. आरोग्य समन्वयक अधिकारी सतिश खारोटे म्हणाले, मला प्राथमिक आरोग्य केंद्र आडुळ येथे काम लावल्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. एका कर्मचाऱ्याची प्रकृती बरी नसल्याने ते कार्यालयात हजर राहू शकत नाही. त्यामुळे आरोग्य उपकेंद्र बंद असल्याचे सांगितले.

हेही वाचा: मराठवाड्यातील मोठ्या धरणांत ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक

औरंगाबाद जिल्हापासून ४५ किलोमीटर अंतरावर असेलेलं पैठण तालुक्यातील मोठ्या गावापैकी एक अशी कडेठाणची ओळख आहे. गावातील गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. अंदाजे साडे चार हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या गावात तीन खाजगी दवाखाने असून एक बाहेर राज्यातून येऊन रुग्णालय चालवणारा बोगस डॉक्टर सुद्धा आहे. विशेष म्हणजे ह्या बोगस डॉक्टरवर अनेकदा तक्रार करून हि आरोग्य विभाग कुठलीही कारवाई करत नाही. आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने लोकांना याच बोगस डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. कडेठाण मध्ये भलं मोठं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे खरं, मात्र ते आठवड्यातून एकही दिवस उघडत नाही.त्यामुळे गावात आरोग्य उप केंद्र असूनही गावकऱ्यांना खाजगी हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी जावे लागते. इथे आरोग्य कर्मचारी येतच नाहीत अशी तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: 'मेडिकलमध्ये चॉकलेट, आईस्क्रिम विकल्यास कडक कारवाई'

बोगस डॉक्टर वाढले!

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र येथे गावकऱ्यांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना पर्यायाने इतर खाजगी रुग्णालयात जावे लागते. हीच बाब लक्षात घेत अनेक बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशसह इतर राज्यातील लोकांनी कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना आणि परवानगी नसताना ग्रामीण भागात मोठमोठी रुग्णालये थाटली आहेत. विशेष म्हणजे हे डॉक्टर्स बिनधास्तपणे लोकांवर उपचार करतात. अनेकदा त्यांच्या चुकीच्या उपचारांमुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो. विशेष म्हणजे यांचा वर कुठलीही कारवाई होत नसल्याने हे डॉक्टर बिनधास्तपणे आपले रुग्णालय उघडून बसतात. तर शासकीय रुग्णालय बंद असल्याने गावकरीही नाईलाजास्तव या बोगस डॉक्टरांना दवाखाना चालवण्यासाठी सहकार्य करतात हे धक्कादायक वास्तव आहे.

हेही वाचा: Beed Lockdown: बीड जिल्ह्यात कडक लॉकडाउन जाहीर

ओ.पी.डी बंधनकारक!

प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी 08.30 ते दुपारी 12.30 पर्यंत ओपीडी सुरू असणे बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रातील ओ.पि.डी. बंदच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयातच जावं लागतं आहे

आरोग्य उपकेंद्राचे उद्दिष्ट

शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे आरोग्य उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठषरोग व हिवतापाच्या रुग्णांणना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येग उपकेंद्रामध्ये एक आरोग्य सेवक (पुरुष) व एक (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचरीका अशा एकूण ३ पदांना शासनाने मान्येता दिली आहे.

हेही वाचा: Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्याची संधी चालून आली आहे. पण यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सामान्यांसाठी किती गरजेची आणि महत्त्वाची आहे याचा प्रत्यय कोरोनाच्या संकटाने आला आहे. खासगी हॉस्पिटल्स परवडत नसतानाही केवळ पर्याय नसल्याने सामान्यांना या हॉस्पिटल्समध्ये जावे लागते. त्याऐवजी जर सरकारी रुग्णालये अद्ययावत झाली, त्यातील सरकारी मानसिकता झटकून कर्मचारी, डॉक्टर यांचे काम सुरू झाले तर नक्कीच देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत होईल. ज्या समाजाचे आरोग्य चांगले असते तो समाज विकसित होत असतो.तरी आरोग्य उपकेंद्र पुर्ववत चालु करावी ग्रामस्थांची मागणी आहे.

हेही वाचा: Heavy Rain: उमरग्यात अवकाळी पावसाचा तडाखा! वीज पडून दोन गाई दगावल्या

या उपकेंद्रात अधिकारी-कर्मचारी राहत नाही. सर्व अधिकारी कर्मचारी अपडाऊन करतात. तिन अधिकारी-कर्मचारी असताना एकही हजर रहात नाही.

-विक्रम जायभाये (सरपंच, ग्रामपचायंत कडेठाण खु)

वारंवार तोंडी मागणी करुन ही या कडे आधिकारी पुर्ण पणे दुर्लक्ष करीत आहेत तरी है उपकेंद्र तत्काळ चालु करुन रुग्णांना सेवा देण्याची व्यवस्था करावी.

-अक्षय झिरपे