Javed Akhtar Awarded at AIFF : "भारतीय सिनेमा निवडण्याची जबाबदारी प्रेक्षकांची", जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार प्रदान

जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार प्रदान, 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखदार सुरुवात.
javed akhtar
javed akhtarsakal

छत्रपती संभाजीनगर - भारतीय सिनेमा अनेक काळातून गेला आहे. प्रत्येक काळात सिनेमाने समाजाचे प्रतिनिधित्व केले. समाजात जेव्हाही संभ्रमावस्था असते तेव्हा एक नवे, मोठे कँरेक्टर सिनेमातून दिसते. आजची बदलत्या सामाजिक परिस्थितीत दर्जेदार सिनेमा तयार करण्याचे आव्हान दिग्दर्शकांसमोर आहे. त्याहीपेक्षा कोणता सिनेमा बघावा, कोणता सिनेमा बघू नये याची मोठी जबाबदारी प्रेक्षकांची आहे.

ज्या सिनेमात स्त्रियांविषयी दर्जाहीन संवाद असतील, ते सिनेमा जर यशस्वी सिनेमांमध्ये गणले जात असतील तर ते सामाजिक संतुलन ढासळल्याचे लक्षण आहे, असे रोखठोक विचार सुप्रसिध्द गीतकार व लेखक पद्मश्री जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.

भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा 'पद्मपाणी' जीवनगौरव पुरस्कार बुधवारी जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात आला. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या ९ व्या 'अजिंठा वेरूळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांना एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात प्रेक्षक, चित्रपटातील स्कॉलर्स यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा प्रमुख अतिथी होते.

दिग्दर्शक आर. बल्की यांनी महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उप व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.

आपल्या सडेतोड विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या जावेद अख्तर यांनी आजचा सिनेमा व प्रेक्षकांची आवड यावर चिंता व्यक्त करत प्रेक्षकांना आत्मचिंतन करायला सांगितले. ते पुढे म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती, आजचे विषम घेऊन समांतर सिनेमा बनवणे दिग्दर्शकांसमोर आव्हान आहे.

मात्र आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल.

तरीही दर्जेदार आशय व नवीन विषय घेऊन आजच्या काळातील दिग्दर्शक मला खरोखरच प्रयोगशील वाटतात. त्यांच्या धाडसाचे कौतुक आहे. मात्र जेव्हा 'चोली के पिछे' सारखे गाणे लाखो लोकांना आवडते तेव्हा मात्र चिंता वाटते. जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून महिलांवर दर्जाहीन संवाद येतात, तेव्हा सिनेमा कसा असू नये असे वाटते. समकालीन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्वपूर्ण आहे.

आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील. कोणता सिनेमा बनवावा, कोणता बनवू नये याचे आत्मचिंतन सिनेसृष्टीने करायलाच हवे. एक काळ होता जेव्हा गरीब चांगली आणि श्रीमंत वाईट अशी धारणा होती. आज मात्र आपल्याला कौन बनेगा करोडपती आवडते. गरीबांना श्रीमंत व्हायचे आहे आणि जेलमध्ये जायचे नाही.

पूर्वी उषा फँन, एखादी इस्त्री, मर्फी रेडिओ म्हणजे श्रीमंती असायची. कार फक्त स्वप्नात दिसायची. आता आपली भौतिक प्रगती झाली. वस्तू वाढल्या, क्रयशक्ती वाढली. सोबतच आपण आपली भाषा,संगीत, नृत्य, वारसा विसरलो. त्यामुळे आमची पिढी मला पहिली गुन्हेगार वाटते,असेही जावेद अख्तर म्हणाले. मला हे शहर खूप लहान वाटले. मात्र इथला प्रतिसाद पाहून मी भारावलो.

विशेषतः चित्रपट महोत्सवात ज्यूरींचा सत्कार होणे ही खूप सुखावह बाब आहे. भारतात १९९३ साली टेलिव्हिजन पासून सुरू झालेली क्रांती आज ओटीटीवर पोचली. प्रत्येक काळात मनोरंजन क्षेत्रात वाढ झाली. मला स्वतःलाही सिनेमा बघणे आवडते. त्यामुळे सिनेमा बनवणे यापेक्षा चांगला जॉब नाही, असे अनुभव सिन्हा म्हणाले.

सिनेमा बघणे, सिनेमा बनवणे हा खरोखरच छान अनुभव असतो. मलाही सिनेमा बघणे आवडते म्हणूनच मी फिल्ममेकर आहे, असे आर बल्की म्हणाले. आत्ताच्या अस्वस्थेच्या वातावरणात जावेद अख्तर यांचे येणे अत्यंत आवश्यक होते. आम्ही अख्तर यांच्या सिनेमातून धर्मनिरपेक्षता, उतारमतवाद बघितला.

साहित्य, सिनेमा, नाटक व समाज सोबतच असतात. त्यामुळे आझाद विचारांचे जावेद अख्तर आमचे प्रेरणास्थान आहेत, असे भावोद्गार चंद्रकांत कुलकर्णी यांनी काढले. आम्हाला सिनेमासोबतच विचारवंत हवे, असे अशोक राणे म्हणाले. नंदकिशोर कागलीवाल यांनी प्रास्ताविक केले.

अजिंठा- एलोरा सारखा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या शहरात सिनेक्षेत्राविषयी खूप क्षमता आहेत. नव्या पिढीला व्यासपीठ देताना या चित्रपट महोत्सवातून फिल्म इन्स्टिट्यूट जन्माला आले असे कागलीवाल म्हणाले. हा चित्रपट महोत्सव नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे.

एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचीही सहप्रस्तुती आहे. महोत्सवाचे डेली हंट डिजीटल पार्टनर, नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी व अभ्युदय फाउंडेशन महोत्सवाचे सह आयोजक आणि एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अॅकॅडमिक पार्टनर आहेत. पूर्वी भावे व नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले आणि संयोजक नीलेश राऊत यांनी आभार व्यक्त केले.

महाराष्ट्राला कलेचा आदर

मी लखनऊमध्ये वाढलो. पण महाराष्ट्राने आल्यानंतर मला समजले की इथल्या लोकांना कलेची जाण आहे. इथे कलेचा आदर होतो. विशेषत: साहित्य, कला, कविता, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीताबद्दल या भागातील सामान्य नागरिक विचार करतो, त्याला सन्मानित करतो. इथे पुस्तके वाचली जातात. इथे मला सन्मान मिळाला, आदर मिळाला, २० वर्षाचा असताना मी मुंबईला आलो. त्यावेळी मी मराठी नाटके पाहिली. दिवसेंदिवस माझे डोळे उघडत गेले, असे भावोद्गार जावेद अख्तर यांनी काढले.

लोगो की 'मन की बात' आम्ही जाणली

ज्या काळात आम्ही सिनेमा बनवला तो सिनेमा लोकांना आवडेल की नाही याची पर्वा न करता आम्ही सिनेमा बनवले. रोमँटिक हिरोच्या काळात रोमान्स न करणारे कँरेक्टर लोकांना आवडले याची कल्पना आम्हाला नव्हती. लोकांशी 'मन की बात' न करताही आम्ही लोकांमधून पुढे आलो होतो. त्यामुळे त्यांची 'मन की बात आम्ही जाणली' असे जावेद अख्तर म्हणाले.

ज्यूरी भारावले सत्काराने

यावेळी स्पर्धा गटाच्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्रृतीमान चॅटर्जी (कोलकाता), प्रसिध्द छायाचित्रकार डिमो पापोव (झेक रिपब्लिक), ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन (पुणे), ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी (दिल्ली) व प्रसिध्द छायाचित्रकार हरी नायर (पणजी) यांचा सत्कार करण्यात आला.

या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसिने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. या समितीचे ज्युरी अध्यक्ष एन. मनू चक्रवर्थी (बंगळूरू), श्रीदेवी पी. अरविंद (कोचीन), सचिन चट्टे (पणजी) हे मान्यवर या समितीत असून त्यांचाही सत्कार झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com