esakal | काष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांची लूट

बोलून बातमी शोधा

मार्केटयार्ड - पावसामुळे  मार्केटयार्डमधील भाज्यांचे भाव कडाडले.
काष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांची लूट
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : रात्रंदिवस शेतीत काबाडकष्ट करून पिकविलेला भाजीपाला टाळेबंदीच्या संकटातून कसेबसे बाजारात पोहोचून ही त्यास दर मिळत नसल्याने कवडीमोल दराने विकावे लागत आहे. मात्र याच भाजीपाल्याची रस्त्यावरील विक्रेत्यांनी लाख मोलाच्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू केल्याचे चित्र उदगीर शहर व परिसरात पाहावयास मिळत आहे.

सध्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी नगरपालिकेने दिलेल्या जागेत भाजीपाला बाजार भरवण्यात येत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरून शेतकरीवर्ग आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन या बाजारात दाखल होत आहेत. या बाजारात प्रचंड गर्दी होत आहे. विनामास्क, विना सॅनिटायझर व्यापारी व खरेदीदार ग्राहक गर्दी करत असल्याने प्रशासनाच्या निर्बंधाचे उल्लंघन होत आहे.

हेही वाचा: निलंगा उपजिल्हा रूग्णालय 'व्हेंटिलेटरवर', तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने रूग्णांचा जीव टांगणीला

या बाजारात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल दर मिळत आहे. टाळेबंदीचे कारण पुढे करून खरेदीदार व्यापारी अत्यंत कमी दराने भाजीपाल्याची खरेदी करत आहेत. मेथी भाजी, हिरवी मिरची वगळता इतर सर्व भाजीपाल्याचा दर हा कवडीमोल झाला आहे. हाच भाजीपाला ज्यावेळी शहरातील विविध चौकात व रस्त्यावरील हातगाड्यावर जातो. त्यावेळेस मात्र त्याचा दर पाचपट होत आहे. दोन रुपये दराने खरेदी केलेली कोथिंबीर पेंडी १० ते १५ रुपये दराने विक्री करण्यात येत आहे. २, ३ रुपयांत खरेदी केलेला दीड ते दोन किलोचा पत्ता गोबी गड्डा ३० रुपये किलो दराने विक्री केला जातो आहे. दहा रुपये किलो दराने खरेदी घेतलेल्या शेवगा शेंगा ४० ते ६० रुपये दराने विक्री केली जात आहे. या भाजीपाला बाजारामध्ये सध्या प्रचंड लूट चालू असून यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत असल्याची स्थिती आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतात उत्पादित केलेला भाजीपाला आहे. त्या दरात विक्री नाही केल्यास टाकून द्यावा लागतो. ही शेतकऱ्यांची मजबुरी येथील भाजीपाला अडते व खरेदीदार व्यापाऱ्यांनी ओळखली असून अन् त्यातच सध्या लागू करण्यात आलेल्या टाळीबंदीचे कारण पुढे करून भाजीपाला बाजारातील दर पाडण्यात आल्याची स्थिती आहे. हा बाजार पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत चालतो. या दरम्यान पोलिस, महसूल, नगरपालिका प्रशासन कोणीही वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा फायदा घेऊन येथील खरेदीदार व्यापारी व अडते यांनी संगनमत करून शेतकऱ्यांना पुरते लुटण्याचा उद्योग सुरू केला असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी साठी पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

पोलिस नगरपालिका महसूल नॉटरिचेबल : या बाजारात संसर्गाचा धोका टाळण्यासंदर्भात लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याने गुरुवारी (ता.२९) सकाळी सहाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी तहसीलदार, पोलीस विभाग, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र काही जणांचे मोबाईल नॉटरिचेबल तर काहींनी आपले फोन उचलले नाहीत. यावरून प्रशासन कोरोणा संसर्गाबाबत किती जागृत आहे? याची प्रचिती आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.