esakal | अन्य आजार नसतानाही मृत्यू अधिक,लातुरात हजाराच्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे बळी
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

अन्य आजार नसतानाही मृत्यू अधिक,लातुरात हजाराच्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे बळी

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेत वेगवेगळे आजार तसेच वृद्ध व्यक्ती अधिक बळी पडल्या. दुसऱ्‍या लाटेत मात्र तरुण तसेच पन्नाशीच्या आतमधील व्यक्तींचा मृत्यू होत आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूमध्ये इतर आजार नसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक झाली आहे. (Latur) जिल्ह्यात १५ मेपर्यंत एक हजार ७६८ पैकी कोणताही (Non Covid Diseases) आजार नसलेले एक हजार २६ जण बळी पडले आहेत. या आकडेवारीवरून नागरीकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण व मृतांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत विशेषतः मार्च, एप्रिल महिन्यांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. तर मृत्यूचे प्रमाण दररोज सरासरी ३० राहिले. (Latur Latest News Above One Thousand Died Due To Non-Covid Diseases)

हेही वाचा: 'पीएम केअर्स'मधून मिळाले नकली व्हेंटिलेटर्स, इम्तियाज जलीलांचा आरोप

अनेक जण आजार अंगावर काढत आहेत. स्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठत आहेत. अशा वेळी डॉक्टरही हतबल होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम मृत्यूची संख्या वाढत आहे. वेगवेगळा आजार असलेल्यांना कोरोना झाला तर तो अधिक त्रासदायक ठरतो. त्यातून अधिक मृत्यू होत होते, हे पहिल्या लाटेत दिसले. दुसऱ्या लाटेत मात्र कोणताही आजार नसलेल्या तरुण, पन्नाशी, साठीतल्या व्यक्ती बळी पडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एक हजार २६ व्यक्तींना कोणताही आजार नव्हता. ७४२ जणांना मात्र वेगवेगळे आजार होते.

पन्नाशीच्या आतील ३०६ जण

कोरोनाने केवळ साठीतल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांना आपल्या कवेत घेतले असे नाही; तर अनेक तरुणांचाही यात बळी गेला आहे. घरातील कर्ते जात आहेत. आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ६२२, ६० ते ६९ वयोगटातील ५२७, ५० ते ५९ वयोगटातील ३१३ जणांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.

२४ तासांच्या आत १९७ जणांचा मृत्यू

कोरोनाचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आतापर्यंत १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. एक ते पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या ८९१ आहे. सहा ते दहा दिवस उपचार घेऊन बळी पडलेल्यांची संख्या ४४० आहे. तर दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊनही कोरोनावर मात करू शकले नाहीत, अशांची संख्या २४० आहे.

हेही वाचा: भाजपकडून नितीन गडकरींच्या सल्ल्याला केराची टोपली

कोरोनाचे लक्षणे दिसताच अंगावर काढू नका. उशीर झाल्यास डॉक्टरही काही करू शकत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. कोरोना झाल्यानंतर केवळ इतर आजारच नाही तर लठ्ठपणाही मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. त्यात हॅपीहायपोक्झियामध्ये रुग्णांचा ऑक्सिजन कमी होतो, पण दम लागत नाही. अशा वेळी रुग्ण आजार अंगावर काढतात. त्यामुळे ते पुढे गंभीर होत आहेत.

- डॉ. मारुती कराळे, कोरोना नोडल अधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर.