Marathwada Muktisangram 2023 : स्‍त्री चळवळीचे योगदान मोलाचेच!

मराठवाडा सर्वच चळवळींमध्ये आघाडीवर आहे. भारताचा स्‍वातंत्र्यलढा आणि निजामाच्‍या तावडीतून मराठवाड्याच्‍या मुक्‍तीसाठी केलेल्या लढ्यात मराठवाड्यातील स्‍त्रिया पुरुषांच्‍या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढल्‍या.
womens
womenssakal

- मंगला खिंवसरा

मराठवाडा सर्वच चळवळींमध्ये आघाडीवर आहे. भारताचा स्‍वातंत्र्यलढा आणि निजामाच्‍या तावडीतून मराठवाड्याच्‍या मुक्‍तीसाठी केलेल्या लढ्यात मराठवाड्यातील स्‍त्रिया पुरुषांच्‍या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढल्‍या. याशिवाय विविध सामाजिक, विशिष्ट प्रश्न घेऊन उभ्या राहिलेल्या चळवळींसह नाट्य, संगीत आणि चित्रकला यातील चळवळींतही मराठवाडा आघाडीवर आहे. आजही अनेक प्रश्‍‍न बाकी आहेत. त्‍यासाठी सर्वसमावेशक अशी चळवळ उभी करण्‍याची गरज आहे….

राठवाड्यातील जनता दोन स्‍वातंत्र्यलढ्याची सहभागी साक्षीदार आहे. एक म्‍हणजे महात्‍मा गांधीजींच्या नेतृत्‍वाखाली झालेली भारताच्‍या स्‍वातंत्र्याची आणि दुसरी म्‍हणजे निजामाच्‍या तावडीतून मराठवाड्याच्‍या मुक्‍तीसाठी केलेली लढाई. दोन्‍ही लढ्यांत मराठवाड्यातील स्‍त्रिया पुरुषांच्‍या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढल्‍या.

१९३८ पासून औरंगाबादला आशाताई वाघमारे, पानकुँवर कोटेचा (फिरोदिया) यांनी माणिकचंद पहाडे आणि नागोरी यांच्‍याबरोबर खूप काम केले. सत्याग्रहात भाग घेणे, सत्याग्रहींना आश्रय देणे, तुरुंगात जाऊन भेटणे, कार्यकर्त्यांना शस्‍त्रे पुरविणे, भूमिगतांची कामे करणे अशी धाडसाची कामे केली.

याच काळात अनेक पुरुष कार्यकर्त्यांच्‍या पत्‍नी, आई, बहीण, तरुण मुले चळवळीत आल्‍या. यामध्‍ये डॉ. सत्‍यवती श्रॉफ, राजकुँवर काबरा, चंदा जरीवाला, इंदूताई सोनदे, कुसुम जोशी, प्रमिला पारनेरकर (कुलकर्णी), शहा भगिनी, चंदा भागवत, कमल मोरे (रांजणीकर) यांनी उघडपणे सत्‍यागृहात भाग घेतला. राजकुँवर काबरा यांनी समाजवाद्यांनी स्‍वतंत्र केलेल्‍या गोवर्धन सराळा येथील जनराज्‍यात महत्त्‍वाची भूमिका केली. दगडाबाई शेळके यांनी शत्रूवर सशस्‍त्र चढाई केली. यात करुणाभाभी चौधरी, प्रतिभाताई वैशंपायन यांचे कार्यही उल्‍लेखनीय होते. भारताला १५ ऑगस्‍ट १९४७ ला स्‍वातंत्र्य मिळाले. पण मराठवाडा मात्र अंदाजे एक वर्षभर उशिरा (१७ सप्‍टेंबर १९४८) स्‍वतंत्र झाला.

womens
womenssakal

१९६० नंतर विनोबाजी भावे यांच्‍याबरोबर भूदान यात्रेत सहभागी होणे, महापूर असो की दुष्‍काळ याप्रसंगी विधायक कामांत महिला मोठ्या प्रमाणात आघाडीवर असत. याशिवाय ७० ते ८० च्‍या दशकात आणीबाणी, आणीबाणीनंतरची निवडणूक, यातही वेगवेगळ्या पक्षांच्‍या नेत्यांच्या नेत्‍या स्‍त्री प्रश्‍‍नावर आणि राजकारणातही आघाडीवर होत्‍या. यात कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या करुणाताई चौधरी, जनसंघाच्‍या कुमुदिनी रांजणेकर, काँग्रेसच्‍या कुसुमताई जोशी, तेजस्विनी जाधव, शरयूताई नागोरी, करुणाताई झेंड, राजकुँवर काबरा आपल्‍या पक्षीय निष्‍ठा कायम ठेवून स्त्रियांच्या या प्रश्‍‍नांवर सक्रिय होत्‍या.

womens
Marathwada Muktisangram 2023 : स्वामी रामानंद तीर्थ यांचे विचार समजून घेणे आवश्यक

मराठवाडा जनता विकास परिषदेने उभी केलेली विविध आंदोलने, अगदी रेल्‍वेरुंदीकरणातही महिला आघाडीवर होत्‍या. मराठवाडा विकास आंदोलन, शिष्‍यवृत्ती वाढ आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्‍या प्रश्‍‍नावर झालेल्‍या आंदोलनात यावेळी प्रा. सुशीला मोरोळे, उषाताई दराडे, लता दलाल आणि इतरही महिला कार्यकर्त्या होत्‍या.

नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांतही महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर होत्‍या. नांदेड गावातील होळी भागात एस.आर. गुरुजी (श्रीरंग देशपांडे) यांनी प्रौढ महिला शिक्षण समिती स्‍थापन केली. या शाळेत ब्राह्मण कुटुंबातील बालविधवा, परित्‍यक्‍ता, परिस्‍थितीने नडलेल्‍या महिला जात होत्‍या.

womens
Marathwada Muktisangram 2023 : वेध उद्योगक्षेत्राच्या भविष्याचा

महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेनंतर (१९६०) हळूहळू मराठीत शिक्षण सुरू केले. नांदेडच पहिले महिला मंडळ हनुमान टेकडीवर स्थापन झाले. सुमनताई प्रधान आणि सुशीलाबाई देशमुख यांनी नेटाने ते चालविले. पहिले बालमंदिर सुमनताई जवळेकर यांनी सुरू केले. मुखेडच्‍या कलावती पाटील यांनी महिला अन्‍याय निवारण समिती स्‍थापन केली. बौद्ध महिला मंडळ (पारूबाई कदम) याशिवाय डॉ. तारा परांजपे ज्‍या स्वातंत्र्यसेनानी होत्‍या. त्‍यांनी तर तळागाळातल्‍या गोरगरिबांपर्यंत पोचून काम केले. यात हसीना शेख, मंदाकिनी धर्मापुरीकर यांचे सहकार्य मोलाचे होते.

कामगार आणि सहकार

याशिवाय नांदेड जिल्‍ह्यात विडी कामगार महिलांचे संघटन कॉ. करुणाभाभी चौधरी यांनी केले. सुशीलाताई रातोळे यांनी विणकर सोसायटी काढून त्‍यातील स्‍त्री-पुरुषांची संघटना बांधली. सहकारामध्‍ये मंदाकिनी जोशी यांनी स्‍थापन केलेली भाग्‍यलक्ष्‍मी महिला सहकारी बँक, जयवंतराव पाटील साखर कारखान्‍याच्‍या संस्‍थापक सूर्यकांता पाटील (अनेक वर्षे खासदार होत्‍या), काँग्रेसच्‍या मंगलाबाई निमकर यांनी पक्षाच्‍या कामाबरोबर महिलांचे संघटन करून प्रश्‍‍न सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न केले.

बीड जिल्ह्यातील चळवळी

नांदेडच्‍या पत्रकारिता क्षेत्रात दैनिक ‘गोदातीर समाचार’च्‍या कुसुमावती रसाळ, पहिल्‍या महिला उद्योजक केटीबेन मेववाला. त्‍यांनी महिला महाविद्यालय सुरू केले. याशिवाय ‘संध्‍याछाया’ वृद्धाश्रमही सुरू केला होता. बीड जिल्‍ह्यात महात्‍मा जोतिबा फुले यांनी स्‍थापना केलेली सत्‍यशोधक चळवळ सुरू होती. १९५७ मध्ये डॉ. शांताबाई कोटेचा (आमदार) यांनी स्‍त्री आरोग्‍यावर मोठे काम केले. खंडेश्‍‍वरी मंदिरात नवरात्रात बकराबळी दिला जात होता, त्‍याच्‍याविरुद्ध जडावबाई कोटेचा यांनी आंदोलन केले.

१९६० पासून बकराबळीची प्रथा बंद झाली. १९७५ ते ८५ या वर्षांत मात्र बीड जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांच्‍या चळवळी झाल्‍या. डॉ. लोहियांनी ‘मराठवाडा नवनिर्माण लोकायत’ ही संस्‍था उभी केली. स्‍त्रियांच्‍या प्रश्‍‍नांसाठी ‘मनस्‍विनी महिला प्रकल्‍प’ सुरू केला. ही जबाबदारी डॉ. शैला लोहिया यांच्‍याकडे होती. १९८५ पासून ‘दिलासा’ निराधार स्‍त्रियांसाठी सुरू केली. भूमिकन्‍या मंडळे काढली. आज बाबूजी आणि भाभी आपल्‍यात नाहीत; पण हे काम त्‍यांची तिन्ही लेकरं मोठ्या नेटाने पुढे नेत आहेत. याशिवाय बीडमध्‍ये दलित, भटकेविमुक्‍त, ऊसतोड कामगार यांच्‍यावर होणाऱ्या अन्‍याय अत्‍याचाराच्‍या विरोधात मनीषा तोकळे, सत्‍यभामा सौंदरमल, अंधश्रद्धेविरुद्ध प्राचार्य सविता शेट्ये या काम करतात.

womens
Marathwada Muktisangram 2023 : काकासाहेब देशमुख : एक झंझावात

राजकारण, साहित्य क्षेत्र

याशिवाय या योगदानात अनेक वर्षे काँग्रेसच्‍या खासदार रजनीताई पाटील, आमदार विमल मुंदडांपासून थेट पंकजा मुंडे यांच्‍यापर्यंतचा राजकीय प्रवास करणाऱ्यांनाही विसरून चालणार नाही. महिला क्षेत्रातील सुहासिनी इर्लेकर, रेखा बैजल यांचाही नामोल्लेख केलाच पाहिजे. डॉ. हेमलता पाटील, प्रा. विजया हिंगोळे आणि अशा कितीतरी साहित्‍यिक, कवयित्री, कथालेखक, आत्‍मचरित्रकार समोर आल्‍या. साहित्‍यक्षेत्रात या सगळ्यांनी मोलाची भर घातली.

लातूरमधील कार्य मोलाचे

लातूर जिल्‍ह्यात स्‍त्रियांच्‍या संबंधीच्‍या उदारमतवादी विचार समाजात रुजविण्‍याचे काम आर्य समाज चळवळीने केले. स्‍त्रीशिक्षण, हुंडाविरोधी चळवळ, विधवा, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहात प्रोत्‍साहन, स्‍वसंरक्षणार्थ स्‍त्रियांना लाठी चालविण्‍याचे प्रशिक्षण आणि सर्वात महत्त्‍वाचे समाजकार्यासाठी स्‍त्रियांना घराबाहेर पडण्‍यास प्रवृत्त करण्‍याचे काम या चळवळीने केले. लातूर, निलंगा, अहमदपूर, उदगीर, रेणापूर, औसा या तालुक्‍यात अनेक कुटुंबे हुंडाविरोधात उभी राहिली. पडदानशील संस्‍कृतीच्‍या बाहेर पडून स्‍त्रिया काम करू लागल्‍या. १९४६ मध्ये गोदावरीदेवी लाहोटी यांनी कन्‍या विद्यालय काढले.

स्‍त्रीशिवाय हा याचा मूळ गाभा होता. १९४८ मध्ये महाराष्‍ट्र विकास परिषदेने लातूर येथे महिला मेळाव्‍याचे आयोजन केले होते. अध्‍यक्षा पानकुँवर फिरोदिया होत्‍या तर स्‍वागताध्‍यक्षा, लातूरच्‍या केसरबाई आर्गव होत्‍या. या पाश्‍‍र्वभूमीवर १९५८ मध्ये माई दिवाणांच्‍या नेतृत्‍वाखाली महिला मंडळाची स्‍थापना झाली. १९५९ ला शहरात पहिली बालवाडी काढली. या सर्व कामांत माई दिवाणांच्‍या बरोबर श्रीमती सावे, गीताबाई राठी, केशरबाई भार्गव होत्‍या. हेमलता वैद्य यांचा मोठा पुढाकार होता.

१९६६-६७ मध्ये लातुरात कॅबरे डान्‍सच्‍या विरोधात महिलांनी मोर्चा काढला होता. १९७५ च्‍या आंतरराष्‍ट्रीय महिला वर्गाच्‍या पाश्‍‍र्वभूमीवर १९७६ मध्ये सरला डक्‍का यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदर्श महिलागृह प्रशिक्षण केंद्र काढण्‍यात आले. तसेच चंद्रकला भार्गव सद्‍भावना कौटुंबिक सल्‍ला केंद्र सुरू केले. १९८३ मध्ये लातुरात ‘मीना तापडिया जळीतप्रकरणी मोर्चा काढण्‍यासाठी चंद्रकला भार्गव व ‘हिरकणीचे बिऱ्हाड’ या आत्‍मचरित्राच्‍या लेखिका सुजिनी आरळीकर यांचा पुढाकार होत्‍या.

शिवाय अहमदपूरमध्‍ये उषा गौतमे यांची ग्रामीण विकास संस्‍था, उदगीरला प्राचार्य ना.य. डोळे आणि डोळे काकू यांचे समाजप्रबोधनाचे काम, मुरूडच्‍या साधना सूर्यवंशी, राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालणाऱ्या सुनीती अरळीकर, केशर महापुरे, जयश्री पाटील, अनुसया गरड, साहिरा मिसा, दीपा गीते यांचे चळवळीतील योगदान मोलाचे आहे. जालना येथे मुमताज देशपांडे, थत्तेकाकू यांच्‍यासारख्‍या किती तरी जणी महिलांच्‍या प्रश्‍‍नावर काम करत होत्‍या. उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात ‘हॅला मेडिकल’च्‍या शुभांगी अहंकारी, डॉ. शशी अहंकारी यांची मोठी टीम आरोग्‍य आणि स्‍त्रियांच्‍या प्रश्‍‍नावर काम करते.

वारकरी, महानुभाव संप्रदाय

मराठवाडा ही संतांची भूमी. संत जनाबाई या गंगाखेडच्‍या, बहिणाबाई वैजापूर तालुक्‍यातील देवगावच्‍या, संत मुक्‍ताबाई पैठणला अनेक दिवस वास्‍तव्‍यास होत्‍या. वारकरी आणि महानुभाव संप्रदायात अनेक स्‍त्रिया होत्‍या. महदंबा या मराठवाड्याच्‍या जवळचाच परिसरातील. महदंबा बालविधवा पण तिला चक्रधरांनी संन्‍यास दीक्षा देऊन दिलासा दिला. वेरूळच्‍या वतनदार भोसल्‍यांची सून आणि छत्रपती शिवरायांच्‍या मातोश्री माँ जिजाऊ यांचाही मराठवाड्याला आणि अख्ख्या देशाला सार्थ अभिमान आहे.

औरंगाबादेत गाजलेली परिषद

औरंगाबाद हे सामाजिक चळवळीचे केंद्र. मराठवाड्यातील पहिली स्‍त्री अत्‍याचार विरोधी परिषद औरंगाबादेत झाली. या परिषदेला थोर लेखिका इस्‍मत चुगताई, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्‍या रांगणेकर यांची उपस्‍थिती होती. मराठवाड्यातून ८० च्‍या दशकात हजारो स्‍त्रिया हजर होत्‍या. त्‍यानंतर आजतागायत स्‍त्रियांच्‍या प्रश्‍‍नावर चळवळी सुरू आहेत. या चळवळीतील स्‍त्री कार्यकर्त्यांची नावे दिली तर लांबलचक यादी होईल. पण काही नावांचा उल्‍लेख (वर ज्‍यांची नावे आली आहेत ती वगळून) करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या चळवळीत मोठ्या संख्‍येने महिला होत्‍या.

नामांतराचा लढा यातही महिलांचा सहभाग प्रचंड होता. डॉ.सुशील सुर्वे, सुजात कांगो, अनुया दळवी, सफिया लक्ष्‍मीनारायण, चंद्रभागाबाई दाणे, डॉ. अरुणा लोखंडे, स्‍त्रियांच्‍या इतर चळवळीत डॉ. ज्‍योत्‍स्‍ना घारपुरे ज्‍यांनी ‘अशा झुंजलो आम्‍ही’ हे मराठवाडा मुक्‍तिसंग्रामातील महिलांचे योगदान यावर पुस्‍तक लिहिले. ताराबाई लड्डा वयाच्‍या ९० व्‍या वर्षीही काम करतात. सध्‍या मराठवाड्यात बहुजन स्‍त्रियांचे प्रश्‍‍न घेऊनही चळवळी उभ्‍या राहताना दिसतात. यात महाराष्‍ट्रभर स्‍त्री नेतृत्‍व उभे राहत आहे. २५ डिसेंबर भारतीय स्‍त्रीमुक्‍तीदिन म्‍हणून साजरा केला जातो. यातून स्‍त्रीमुक्‍तीची चळवळ गतिमान होताना दिसते.

भटक्‍या विमुक्‍त जाती-जमातीची चळवळ महाराष्‍ट्रभर नेण्‍याचे काम प्रा. मोतीराज राठोड, कला राठोड, आसाराम गुरुजी, यमुनाबाई गायकवाड, नाशिकचे जी.जी. चव्‍हाण, मरणकळाच्‍या लेखिका जनाबाई गिऱ्हे, के.ओ. गिऱ्हे यांनी केले. गुन्‍हेगारी कायदा रद्द करा, बिऱ्हाड मोर्चा यांनी तर महाराष्‍ट्रभर ही चळवळ उभी राहिली.

नाट्यचळवळही जोमात

मराठवाड्यात नाट्यचळवळी ही जोमातच आहेत. ‘जिगीषाने ८० च्‍या दशकात ती सुरू केली. तत्‍पूर्वी दलित नाट्यचळवळ होत्‍या. यामध्‍ये विजया शिरोळे होत्‍या. त्‍यामुळे असं कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिला आघाडीवर नाहीत. विज्ञानामध्‍येही सध्‍या डॉ. सुनीती धारवाडकर विविध पुस्‍तकांच्‍या रूपाने वाचकांसमोर येत आहेत. एक विज्ञानवादी दृष्‍टी देण्‍याची चळवळ त्‍यांची आहे.

सर्वच चळवळींत आघाडी

सर्वच चळवळीमध्‍ये मराठवाडा आघाडीवर आहे. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी, तुलनेने विकसित शहर, परिणामी संधीही भरपूर. १९७५ नंतर समाजकला, शिक्षण, साहित्‍य, सांस्‍कृतिक, समीक्षा, कथाकार, कवयित्री, कादंबरीकार, आत्‍मचरित्रे यातही मराठवाडा मागे नाही. काही नावांच्‍या यादीवरून हे लक्षात येईल. विकास आंदोलनात लता दलालही आघाडीवर होत्‍या. कादंबरीकार अनुराधा वैद्य (माझी चिंध्‍याची बाहुली), सुनेमा ओळ, डॉ. कुमुद गोसावी, समीक्षक उषा हस्‍तक, छाया महाजन, अनुराधा पाटील, इंदुमती जोंधळे (बिनपटाची चौकट) वृदां दिवाण, जयश्री खारकर, लता मोहरीर, स्‍त्री कादंबरीकार मथू सावंत यांचा समावेश आहे. संगीत आणि चित्रकला यातही मराठवाडा चळवळीत आघाडीवर आहे.

स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्‍या चळवळीचा वारसा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान देण्‍याचे काम आताची पिढीही वेगवेगळी नावे घेऊन करीत आहे. त्‍यामुळे विकासासाठी, प्रगतीसाठी वेगवेगळ्या, प्रश्‍‍नांवर आवाज उठविणे ही मराठवाड्याची ताकद आहे. हीच ताकद चळवळ म्‍हणून उभी राहील. आजही अनेक प्रश्‍‍न बाकी आहेत. त्‍यासाठी सर्व जाती- धर्मातील स्‍त्रियांना सोबत घेऊन सर्वसमावेशक अशी चळवळ उभी करण्‍याची गरज आहे. मराठवाड्यामध्ये शेतकरी संघटनेची चळवळ ही एकेकाळी जोरात होती. शेतकरी संघटनेचेे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात अामदार सरोज काशीकर, वैजापूरच्या आनंदीबाई अन्नदाते, केशरकाकू गवारे, सुमनबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ झाली.

(लेखिका स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com