esakal | इच्छुकांना लस मिळेना अन् हक्काचे घेईनात! तब्बल ३५ हजार लसी शिल्लक
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

इच्छुकांना लस मिळेना अन् हक्काचे घेईनात! तब्बल ३५ हजार लसी शिल्लक

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिक महापालिकेकडे खेट्या मारत आहेत. पण शासन आदेशानुसार सध्या फक्त ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण (covid 19 vaccination) सुरू असल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. ४५ वर्षावरील व्यक्ती लस घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पडून असलेल्या लसींची संख्या ३५ हजार एवढी झाली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खेळखंडोबा सुरू आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली पण केंद्र शासनाने फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने लसीकरणाची गती वाढविण्यात आली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर जोरदार प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसी तब्बल १० हजारपेक्षा जास्त लसीकरण महापालिकेमार्फत करण्यात आले. पण या वयोगटाच्या लसींची जबाबदारी राज्य शासनावर टाकण्यात आली.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

राज्य शासनाला लसी मिळत नसल्याने हे लसीकरण स्थगित करण्यात आले व ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस केले. तेव्हापासून लसीकरणाची गती मंदावली आहे. दिवसाला जेमतेम हजार ते दीड हजार लसीकरण केले जात आहे तर शासनाकडून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे लसी पडून राहत आहेत. सध्या ३५ हजार लसी महापालिकेकडे पडून आहेत.

विद्यार्थी, दिव्यांग, बेघरांचा देखील अल्प प्रतिसाद-
लसीकरणाला गती देण्यासाठी महापालिकेने विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व नोकरीनिमित्त विदेशात जाणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच कारमध्ये बसून या लस घेऊन जा अशी ‘ड्राईव्ह इन’ मोहीम सुरू केली. त्यासोबतच दिव्यांग, बेघर आणि ओळखपत्र नसलेल्या नागरिकाचे लसीकरण केले जात आहे. पण या मोहिमेला देखील फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रशासन हतबल झाले आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! जालन्यात डोहातील पाण्यात बुडून तिघा भावंडांचा मृत्यू

महापालिकेला मिळालेल्या लसी- पंधरा दिवसात ४१ हजार लस मिळाली
-२६ मे ११ हजार २००
-२८ मे सात हजार ९००
- एक जून एक हजार ८५०
-तीन जून रोजी ११ हजार १००
-नऊ जून आठ हजार ५५०
-एकूण-४० हजार ६००