esakal | Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न 'जैसे थे', पर्यटन राजधानी औरंगाबादला ठेंगा

बोलून बातमी शोधा

Marathwada News

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढवणे खूप गरजेचे आहे. तसेच या भागातील रेल्वेप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीतर्फे विविध व्यासपीठांवर उपस्थित केले जात होते.

Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न 'जैसे थे', पर्यटन राजधानी औरंगाबादला ठेंगा
sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : अर्थसंकल्पातून मराठवाड्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी काही महत्त्वाच्या तरतूदींची घोषणा केली आहे. आज सोमवारी (ता.आठ) त्यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला. त्यात उस्मानाबाद व परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालये उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या लातूरसाठीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

Maharashtra Budget2021 : उस्मानाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा मार्ग सुकर, अर्थमंत्री अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जालना-नांदेड महामार्गासाठी सात हजार कोटींची देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी चारशे कोटींपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्पात मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी आणखी जोराचा प्रयत्न करणे अपेक्षित होते.

मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न जैसे थे
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढवणे खूप गरजेचे आहे. तसेच या भागातील रेल्वेप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीतर्फे विविध व्यासपीठांवर उपस्थित केले जात होते. राज्यातील इतर रेल्वेप्रश्न सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या क्रीडा विद्यापीठासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले होते. पण अर्थसंकल्पात त्याबाबत काही तरतूद झालेली नाही. मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे आवश्यक होती. राज्याच्या पर्यटन राजधानीला आणखी भरीव आर्थिक मदतीची गरज आहे.