esakal | उमरग्यात कोरोना मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत, नऊ महिन्यांत १७७ जणांचा मृत्यु

बोलून बातमी शोधा

corona updates
उमरग्यात कोरोना मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत, नऊ महिन्यांत १७७ जणांचा मृत्यु
sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यात गेल्या नऊ महिन्यांत नगरपरिषद प्रशासनाने १७७ कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले. एप्रिल महिन्यातील २७ दिवसांत ९८ जणांवर अंत्यसंस्कार केले असताना कोविड उपजिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत १३३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. ४४ जणांच्या मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नोंदी आरोग्य विभागाकडे घेतल्या नाहीत. आरोग्य विभागाने बाहेर राज्य व इतर तालुक्यातील मृतांची नोंदी घेतल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. उमरगा तालुका सीमावर्ती भागातील शेवटचा आणि राज्यातील एकमेव तालुका असल्याने आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात असल्याने सीमावर्ती भागातील व शेजारील तालुक्यातील बहुतांश व्यक्ती तालुक्यात येतात तर काही जण विविध कामानिमित्त वास्तव्यास आहेत. मागील नऊ महिन्यांपासून कोरोना संसर्ग सुरू असल्याने उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत १५ हजाराहून अधिक रॅपिड ॲंटिजेन चाचणी, तर दहा हजार ९६ जणांचे स्वॅब चाचणी घेण्यात आले आहे. यामध्ये तीन हजार ७३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तीन हजार बारा जण कोरोनामुक्त झाले असून १३३ जणांचा मृत्यू झाल्याने ५९० जण उपचारात असल्याची नोंद आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

पालिकेकडे मृत्युची नोंद १७७

नऊ महिन्यांत १७७ मृत्यू झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. त्यात ६३ महिला व ११४ पुरुषांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांत ११० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यात बारा बाहेर राज्यातील असून २४ संशयित रुग्णांचा समावेश आहे. पालिका व आरोग्य प्रशासनात ४४ मृतांच्या नोंदीची तफावत दिसून येत असल्याने ही नेमकी तफावत कशी झाली याची स्पष्टता होत नाही.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणूक : शपथपत्र दाखल करण्यास चार आठवड्यांची मुदत

एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू

एप्रिल महिन्यात २७ तारखेपर्यंत पालिकेने ९८ जणांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमध्ये केवळ ४६ मृत्यू झाले असल्याच्या नोंदी आहेत. खासगी कोविड सेंटर रुग्णालयात मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांची नोंद शासकीय कोविड सेंटरला झाली नसल्याने मृत्यूचा अचूक आकडा प्रशासनाकडून दिला गेला नाही. खासगी कोविड सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पत्र पालिकेकडे पाठविले जाते. मात्र उपजिल्हा रुग्णालयालाकडे नोंदीसाठी पत्र दिले जात नव्हते. आता उशीरा का होईना नोंदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान बुधवारी (ता. २८) मृत्युचा अकडा शंभरापुढे गेला आहे.

हेही वाचा: Breaking News| औरंगाबाद महापालिकेच्या स्टोअरमधून 48 Remdesivir इंजेक्शन चोरी

बाहेर राज्यातील व तालुक्यातील नोंद नाही

उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेरील राज्यातील व तालुक्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची मृत्यूची नोंद घेण्यात येत नसल्याचा खुलासा केला असला तरी शहरात वास्तव्यास असलेले अन्य राज्य व तालुक्यातील नागरिक आहेत. मात्र अधिकृत पत्ता त्यांच्या मुळ गावातील आहे. आरोग्य प्रशासन यांचे मृत्यूची नोंद घेत नाही. पण रॅपिड आणि आरटीपीआरची  चाचणी केली जाते. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय किंवा खासगी कोविड सेंटर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर पालिका प्रशासन शहरात अंत्यसंस्कार करते मग आरोग्य प्रशासन अधिकृत नोंद का घेत नाही. असा प्रश्न उपस्थित केला जातोय.