esakal | बियाणे-खतांतील भेसळ खपवून घेणार नाही, मंत्री शंकरराव गडाखांचा इशारा

बोलून बातमी शोधा

null

बियाणे-खतांतील भेसळ खपवून घेणार नाही, मंत्री शंकरराव गडाखांचा इशारा

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : यंदाच्या खरीप हंगामात बियाणे-खतांतील भेसळ खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. गेल्या वर्षी बँकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून यंदाही पुरेसे पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सोमवारी (ता.२६) खरीप आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतिलक रोषन, अधीक्षक कृषी अधिकारी आर. यु. घाटगे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात सध्या कोरोनासोबत सर्वांची लढाई सुरू आहे. अशा स्थितीत कृषी उत्पादनाला कोठेही बाधा पोहोचू नये. यासाठी राज्यात सर्वात प्रथम खरीप हंगाम आढावा बैठक घेतली असल्याचे सांगत पालकमंत्री गडाख यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला. गेल्या वर्षी कृषी विभागाने योग्य नियोजन केले होते. त्यातच पुरेसा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील उत्पादकता वाढली आहे. जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब असून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडत आहेत. गेल्या पाच वर्षांत सोयाबीन पिकाची सरासरी उत्पादकता ८६० किलो प्रतिहेक्टर होती. यामध्ये वाढ होऊन २०२०-२१ वर्षात या पिकाची उत्पादकता एक हजार ६७७ किलो प्रतिहेक्टर झाली आहे.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी होते. त्यात यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन पेरा वाढणार आहे. बियाणे तसेच खतांमध्ये होणारी भेसळ टाळण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. भेसळयुक्त बियाणे विकणाऱ्यां कंपन्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांची माहिती प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवावी. जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख ३४ हजार १४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. यंदा सुमारे तीन लाख ७४ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित असून त्यासाठी महाबीजकडून ५७ हजार ७५० क्विंटल, एनएससी पाच हजार क्विंटल आणि खासगी कंपन्याकडून ३७ हजार ९७४ क्विंटल असे एकूण ९४ हजार ७२४ क्विंटल बियाण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान काही कंपन्यांनी बनावट बियाणे दिल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासून पेरणी करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. गडाख यांनी केले आहे. शिवाय सोयाबीनच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरतात. त्यांनीही उगवण क्षमता तपासून पेरणी करावी. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र पाच लाख ५६ हजार ४६८ हेक्टर प्रस्तावित आहे. तर मागील तीन वर्षांचा सरासरी खताचा वापर ५७ हजार २७५ एवढा आहे. सध्या २५ हजार ३९६ एवढा साठा शिल्लक असून ९३ हजार एवढी खताची मागणी केली आहे. यंदा पाऊस झाल्याने खताची मागणी वाढली आहे. बियाणे तसेच खतांची भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुकास्तरावर एक अशी पथके तयार केली आहेत. जिल्ह्यात २६ गुणनियंत्रण निरीक्षक तपासणीसाठी असणार आहे. याशिवाय आणखी तपासणी वाढविण्याच्या सुचना पालकमंत्री गडाख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी काढणी पश्चात पिकविमा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून पंचनाम्याची यादी त्वरीत तयार करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या आहेत.

हेही वाचा: 'ड्रॅगन फ्रूट'चं भाजपनं केलं नामांतर ते 'अलिबाबा'चे जॅक मा सापडले; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

कृषी कर्जासाठी एकच अर्ज : कृषी पिककर्जाची प्रक्रिया सोपी व सुटसुटीत व्हावी. यासाठी सर्वच बँकांत एकच अर्जाचा नमुना असावा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षात ६०० कोटींपर्यंत पिककर्ज वाटप केले जात होते. गेल्या वर्षीत यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सुमारे १२१८ कोटी रुपयांपर्यंत पिककर्ज वाटप झाल्याने बँक प्रशासनाचे पालकमंत्री गडाख यांनी अभिनंदन केले आहे. यंदाही यामध्ये वाढ करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.