शेतकऱ्यांना २४ वा हप्ता उद्या होणार वितरित
-------
पीएम किसान योजना;आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे
---
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २८ ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील २४ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३०) गुजरातमधील बनासकांठा येथून वितरित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने केंद्र शासनाने हा दिवस देशभरात ‘पीएम किसान उत्सव दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांत म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे, आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) जमा केले जातात. राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी २३ हप्त्यांद्वारे सुमारे ४२ हजार ९३५ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी जमिनीच्या अभिलेखांची नोंद अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे. या तिन्ही अटींची पूर्तता केलेल्या राज्यातील ९१.१३ लाख शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यांत ३० ऑक्टोबरला सुमारे एक हजार ८३५ कोटी रुपयांचा २४ वा हप्ता थेट जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणेही आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक नोंदी आणि प्रमाणीकरणाची पूर्तता करावी. पीएम किसान उत्सव दिनानिमित्त राज्यात कृषी विभाग, महसूल व वन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना आणि प्राथमिक कृषी पतसंस्था येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या (https://pmindiawebcast.nic.in) या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. शेतकरी बांधव आणि भगिनींना नागरी सुविधा केंद्रांमधूनही या प्रक्षेपणात सहभागी होता येईल. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.