esakal | औरंगाबादेत पावसाचा कहर; खामनदीसह शहरातील नाले तुडुंब । Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेत पावसाचा कहर; खामनदीसह शहरातील नाले तुडुंब

औरंगाबादेत पावसाचा कहर; खामनदीसह शहरातील नाले तुडुंब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळाने शहराला जोरदार तडाखा दिला असून, सोमवारी (ता. २७) मध्य रात्रीपासून आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. मंगळवारी (ता. २८) सकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला. १०.५१ ते ११.२१ या अर्ध्या तासात ढगफुटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. तब्बल ५२.२ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात हाहाकार उडाला.

हेही वाचा: मित्रा अन्‌ मजिप्रा कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

खामनदीसह शहरातील नाले तुडुंब भरले. खाम नदीला २००७ नंतर मोठा पूर आला. जटवाडा येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ या भागाचा शहराशी संपर्क तुटला. पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने सखल भागातील वसाहतींमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. सातारा-देवळाई परिसरालाही पाण्याचा वेढा पडला होता. टाऊन हॉल, औरंगपुरा पट्ट्यात याच काळात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. महापालिका मुख्यालयातील तीन झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. या पावसामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी याचना केली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांचे मदतकार्य सुरूच होते. दरम्यान, पावसाच्या अधून-मधून सरी देखील सुरू होत्या.

हेही वाचा: देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर, ३० ऑक्टोबरला मतदान

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. त्यात गुलाब चक्रीवादळामुळे मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री सुमारे १२ वाजेपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. अधून-मधून उसंत घेत रात्रभर धो-धो पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास पावसाचा जोर एवढा वाढला की, अर्ध्या तासात तब्बल ५२.२ मिलिमिटर पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण शहरात हाहाकार उडाला. सर्वत्र नदी नाल्यांना पूर आला. नाल्याकाठच्या भागात पावसाचे पाणी साचले. हे पाणी अनेकांच्या घरात तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरले.

विद्यानगर वॉर्डातील वेदमंत्रा अपार्टमेंट, अलंकार सोसायटीमध्ये पाणी शिरले. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक तथा माजी नगरसेवक राजू वैद्य यांनी तातडीने वॉर्ड अभियंता वाघमारे यांना कळवून मदतीसाठी बोलावून घेतले. क्रांती चौक वॉर्डात सिध्देशनगर, न्यू. श्रेयनगर भागात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. वॉर्ड अभियंता नाना पाटील, परदेशी यांनी जेसीबीने नाल्याचा प्रवाह मोकळा केला. औषधी भवनच्या नाल्याचे पाणी दलालवाडीतील दहा घरांमध्ये शिरले. घरासमोर उभी असलेली दुचाकी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती. माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी यांनी शिवसैनिकांच्या मदतीने दलालवाडीतील वाहने गल्लीबाहेर काढले. नागेश्वरवाडीतही घरांमध्ये पाणी शिरले होते.

loading image
go to top