esakal | RTO मध्ये ट्रॅप...भ्रष्टाचाराचे कधी भरेल माप?
sakal

बोलून बातमी शोधा

rto

RTO मध्ये ट्रॅप...भ्रष्टाचाराचे कधी भरेल माप?

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद: आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील पथकाने छापा मारल्याच्या घटनेनंतर काही वेळ खळबळ उडाली. दिवसभर आरटीओतील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा चर्चिल्या जात होत्या. या विभागातील भ्रष्टाचाराचे माप कधी भरेल, असे प्रश्‍नही नागरिक विचारत होते. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची (एसीबी) कारवाई काही नवीन नाही.

सोमवार आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने कार्यालयात येणाऱ्यांची संख्या अधिक होतीच, दुपारी साधारण बाराच्या सुमारास छापा पडल्यानंतर कार्यालयात आणि परिसरात चर्चा रंगू लागल्या. कारवाई सुरु असताना परिसरात सन्नाटा पसरला होता. प्रत्येकजण दूर उभे राहून काय सुरु आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. काहीजण चिंता व्यक्त करत होते तर अनेक जण अभिनंदन म्हणत झालेल्या कारवाईबद्दल समाधानही मानत होते. जे झाले ते होणारच होते, जे झाले ते चांगले नाही झाले, आरटीओत ही बाब नवीन नाही, अशा एक ना अनेक चर्चा झडत होत्या.

हेही वाचा: चांगली बातमी! अखेर पोलिस भरतीची प्रतिक्षा संपली

कथा क्र. १
आरटीओ कार्यालयाकडून स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सरबराई केली जाते. ‘पोलादी संबंध’ असल्याने एसीबीचे स्थानिक अधिकारी आरटीओ कार्यालयात ट्रॅप करत नाहीत, अशी चर्चा आहे. आरटीओतील तक्रार आली तर लगेच उलट तक्रार आलेल्या संबंधितालाच काय तक्रार आहे हे सांगत सावध केले जाते आणि ट्रॅप होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली जाते, अशी चर्चा होती.

कथा क्र. २

आरटीओ कार्यालयातील अधिकारी अर्थकारणाशिवाय कामच करीत नाहीत. कोणत्या कामासाठी किती पैसे द्यावे लागतात, ते कसे द्यावे लागता, ते कुणाला द्यावे लागतात, याच्या खमंग चर्चा कार्यालयाच्या परिसरातील हॉटेल, टपऱ्या आणि घोळक्यांमध्ये आज रंगल्या होत्या.

कथा क्र. ३

आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैशांच्या देवाणघेवाणीचे अनधिकृत व्यवहार होतात. त्यामुळे छापा पडणे ही बाब अपेक्षितच आहे. पण अधिकाऱ्यांनीही पैसे घेताना भान ठेवले पाहिजे! आतापर्यंत शेकडो अधिकारी आले आणि गेले ज्यांना हे भान होते, त्यांनी प्रचंड पैसा कमावला आणि ज्‍यांना जमले नाही ते ट्रॅपमध्ये अडकलेच अशीही सुरस चर्चा होती.

हेही वाचा: धानुरीत एका रात्रीत सात घरे फोडून चोरी; लाखोंचे दागिने लंपास

कथा क्र. ४

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकल्यानंतर सर्व हतबल झाले. त्यामुळे तातडीने निरीक्षकांना मध्यस्थी करण्यासाठी कामाला लावले आहे. काही निरीक्षक त्यासाठी एसीबी पथक आणि आरटीओ कार्यालयात दुवा म्हणून काम करीत आहेत. या प्रकरणात काहीही होणार नाही, वेळ जाऊ द्या सर्व सुरळीत होईल, असा बिनधास्तपणाचा सूरही होता.

loading image