esakal | इंग्रजी शाळांना बाय बाय करत औरंगाबादेत तब्बल सात हजार विद्यार्थी ‘झेडपी’त दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

zp shala.jpg

 

दर्जेदार शिक्षणाची वारी, जिल्हा परिषद शाळाच बरी!

इंग्रजी शाळांना बाय बाय करत औरंगाबादेत तब्बल सात हजार विद्यार्थी ‘झेडपी’त दाखल 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : अध्ययन-अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, उपक्रमशीलतेतून वाढलेली लोकप्रियता आणि नव्या दमाच्या शिक्षकांना जुन्याजाणत्या शिक्षकांनी पाठबळ दिल्याने वाढलेली गुणवत्ता या कारणांमुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जि.प. शाळांनी ‘शाळा बंद-शिक्षण सुरु’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. विद्यार्थी शाळाबाह्य होवू नये म्हणून शिक्षण विभागाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. म्हणून २०२०-२१ या वर्षात खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बाय-बाय करीत जि.प. शाळेत तब्बल सहा हजार ९८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना काळातही विविध माध्यमांचा वापर करत वाड्यावस्त्या, खेड्या-पाड्यातील दुर्गम भागात शिक्षकांनी पोचून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. यात प्रामुख्याने विद्यार्थी-शिक्षक मित्र, प्रत्यक्ष गृहभेटी, गावातील मोकळ्या जागेत ज्ञानदान, मोबाइल, इंटरनेटच्या तसेच जाणकार पालकांच्या मदतीने अभ्यास घेतला. काही तंत्रस्नेही शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध करुन दिल्या. जि.प. शाळेत परीवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. पालकांचाही कल या शाळांकडे वाढला आहे. जिल्ह्यात नऊ शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी पालक, दानशुर व्यक्तींकडून भौतिक सुविधांसह डिजिटल साहित्य, शाळेसाठी जमीन देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शुल्कवसुलीचा परीणाम 
कोरोनाच्या काळात जिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांकडून ऑनलाईन शिक्षणाचे जबरदस्तीने शुल्क वसुल करत होते तेथे जि.प. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करत होते. ऑनलाईन, ऑफलाईन यासह विविध माध्यमांचा वापर करीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहत ठेवले. याची दखल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील घेतली होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन शिक्षणासाठी १ हजार ५८ शाळांची सप्टेंबर अखेरपर्यंतची माहीती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख १५ हजार १३१ विद्यार्थ्यांचे ८ हजार ६८६ गट तयार करण्यात आले. १२ हजार २१५ पालक मित्र आणि १५ हजार १०४ विद्यार्थी मित्रांच्या मदतीने विविध माध्यमांतून शिक्षण सुरु ठेवले. नेटवर्कच्या अडचणी असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना साहित्याच्या उपलब्धतेनुसार शिक्षण दिले. 
-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक 

२०२०-२१ मध्ये वाढलेले विद्यार्थी 

 • - औरंगाबाद ः १२०० 
 • - सिल्लोड ः ११५३ 
 • - वैजापूर ः १०८७ 
 • - पैठण ः ९५८ 
 • - फुलंब्री ः ६४४ 
 • - गंगापूर ः ६४१ 
 • - कन्नड ः ६३२ 
 • - खुलताबाद ः ३९३ 
 • - सोयगाव ः २७८ 
 • --------- 
 • एकूण ः ६,९८६ 

(संपादन-प्रताप अवचार)