Trading Scam : ‘ट्रेडिंग’मध्ये महिलेला २६ लाखांचा गंडा; ऑनलाइन फसवणूकप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा

खासगी कंपनीत चांगल्या पदावर तसेच वर्क फ्राॅम होम करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला ऑनलाइन ट्रेडिंगच्या व्यवहारात भामट्याने तब्बल २६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Trading Scam
Trading Scam Sakal

छत्रपती संभाजीनगर : खासगी कंपनीत चांगल्या पदावर तसेच वर्क फ्राॅम होम करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला ऑनलाइन ट्रेडिंगच्या व्यवहारात भामट्याने तब्बल २६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी महिला चिकलठाणा विमानतळासमोरील ‘माय वर्ल्ड’ येथे राहते. खासगी कंपनीची ती कर्मचारी असून, सध्या ती वर्क फ्रॉम होम करते. तिला मोबाईलवर अनुराग ठाकूर नावाच्या व्यक्तीने संपर्क करून ‘आम्ही केकेआर ग्रुप ट्रेडिंगकडून बोलत आहोत’, असे सांगितले. तिला विश्वासात घेत गुंतवणूक करण्यास सांगितले. तिने काही पैसे गुंतविले. त्यात वाढ होत असल्याचे तिला रिपोर्ट दाखविले.

यादरम्यान ठाकूरच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधत गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून महिलेने २६ लाख ६० हजार रुपये गुंतविले. मात्र, परताव्यावर पैशांची मागणी केल्याने अनुराग ठाकूर व त्याच्या सहकाऱ्यांकडून आपली फसवणूक केल्याचे तिच्या निदर्शनास आले.

हा सर्व प्रकार तिने पतीला सांगितला, दोघांनी शनिवारी (ता. १३) पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपास पोलिस निरीक्षक गौतम पातारे हे करत आहे.

असा आला संशय

महिलेने जवळपास २६ लाखांहून अधिक रक्कम गुंतविली होती. त्यानंतर ‘तुम्ही गुंतवलेल्या २६ लाखांचे ८५ लाख रुपये झाले आहेत’, असे तिला सांगण्यात आले. त्यावर तिने हे पैसे काढून देण्यास त्यांना सांगितले. ‘पैसे काढायचे असतील, तर त्यासाठी १२ लाख ७९ हजार रुपये टॅक्स भरावा लागेल’, असे तिला सांगण्यात आले. त्यावर महिलेला संशय आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com