esakal | औरंगाबादचा स्मार्ट सिटीत राज्यात शेवटचा नंबर 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

शहर बस वगळता इतर प्रकल्प अजूनही अपूर्णच आहेत. एमएसआय प्रकल्पाचे काम सुरू झाले असले तरी ते पूर्ण झालेले नाही तर सफारी पार्कची निविदाही रखडली आहे. त्यामुळे शहराला फटका बसला आहे.

औरंगाबादचा स्मार्ट सिटीत राज्यात शेवटचा नंबर 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाने शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असला तरी त्यातून केली जाणारी कामे अद्याप मार्गी लागली नाहीत. त्यामुळे केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या मूल्यांकनात शहराचा नंबर घसरला असून, राज्यात सर्वात शेवटी म्हणजेच ६६ वे स्थान औरंगाबादला मिळाले आहे. एमएसआय, सफारी पार्कसह इतर महत्त्वाचे प्रकल्प रखडल्यामुळे शहराची ४९ व्या क्रमांकावरून घसरण झाली आहे. 

केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटी संदर्भातील कामाचा आढावा घेऊन प्रत्येक महिन्यात शहरांना मूल्यांकन दिले जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या मूल्यांकनात शहराची घसरण झाली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला निधी खर्च करण्यात अपयश आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

केंद्र व राज्य सरकारने सुरुवातीला औरंगाबाद स्मार्ट सिटी कंपनीला २९१ कोटींचा निधी दिला. त्यातून सिटी बस सेवा, एमएसआय, सफारी पार्क, सोलार पॅनल प्रकल्प आदी प्रकल्प करण्याचे निश्चित झाले. मात्र शहर बस वगळता इतर प्रकल्प अजूनही अपूर्णच आहेत. एमएसआय प्रकल्पाचे काम सुरू झाले असले तरी ते पूर्ण झालेले नाही तर सफारी पार्कची निविदाही रखडली आहे. त्यामुळे शहराला फटका बसला आहे. 

करोनामुळे कार्यालय दोन दिवस बंद 
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटीचे कार्यालय दोन दिवस बंद ठेवले. कार्यालय सँनिटाईज करून सर्वच कर्मचाऱ्यांच्या अॅन्टीजेन चाचण्या करून घेण्यात आल्या.ज्यांना लागण झाली ते दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. तेथून परतल्यावर त्याला त्रास होऊ लागला, त्यामुळे त्याने अँटिजेन टेस्ट करून घेतली, त्यात तो पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 
 
राज्यातील प्रमुख शहरांचे क्रमांक 
राज्यात औरंगाबाद शेवटच्या स्थानावर आहे. नाशिक १५, पुणे २८, नागपूर ४२, सोलापूर ४३, ठाणे ५५, पिपंरी चिंचवड ६१, कल्याण डोंबीवलीचा ६२ वा क्रमांक आहे तर औरंगाबाद ६६ व्या स्थानावर आहे.

loading image