esakal | व्यथा! दर आठवड्याला लागते नवीन अंडरविअर-बनियन!
sakal

बोलून बातमी शोधा

Status of Workers in Steel Factories

 

  • स्टील कारखान्यांत वेठबिगाराप्रमाणे काम, तक्रारींचीही सोय नाही 
  • सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, प्रशासन, कामगार अधिकारी ढिम्म 

व्यथा! दर आठवड्याला लागते नवीन अंडरविअर-बनियन!

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : जालना येथील मजूर रेल्वेखाली चिरडून ठार झाले ही हृदयद्रावक घटना केवळ अपघातामुळे समोर आली. येथील स्टील कंपन्यांमध्ये आतापर्यंतच्या विविध अपघातात शेकडो कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत, अशी अनेक प्रकरणे दाबण्यात आलेली आहेत. कुठल्याही सुरक्षेविना कामगारांकडून बारा तासांपर्यंत वेठबिगाराप्रमाणे काम करवून घेतले जाते. तप्त भट्टीजवळ काम करताना घामाच्या धारांनी कामगारांची अंडरविअर-बनियन खराब होते, म्हणून प्रत्येक आठवड्याला हे कपडे नवीन खरेदी करावे लागतात. भयावह उष्णतेत कामगारांना काम करावे लागते. त्यांना तक्रार करण्याचीही सोय नाही. दुसरीकडे निर्ढावलेले कामगार अधिकारी आणि सुस्त प्रशासन यामुळे त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. 
  
इतर राज्यातील मजुरांचा भरणा 
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि गुजरात राज्यातील मजूर या ठिकाणी कामाला आहेत. स्टील कॅपिटल अशी ओळख असलेल्या जालना शहरात येथील कारखानदार गेल्या वीस वर्षांपासून स्थानिक कामगारांना कामावर न ठेवता ठेकेदाराला हाताशी धरून परप्रांतीय मजुरांना कामावर ठेवत आहे. त्यामुळे कारखान्यांतील अपवादात्मक अपघातच समोर येतात. 

 वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
 
नेहमी होतात स्फोटाच्या घटना 
हे सर्व मजूर जालना परिसरात चंदनझिरा या भागात भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. ठेकेदार पद्धतीमुळे कंपनीचा मालक आणि कामगार याचा काहीही संबंध नसतो. कारखान्यांमध्ये अपघात होतात त्यावेळी कंपनी मालक ठेकेदाराला ठराविक रक्कम देऊन प्रकरण मिटविण्याचे सांगतो. ठेकेदारही ‘इमानेइतबारे’ हे मिटवामिटवीचे काम पार पाडतो. कारखान्यांमध्ये स्पोट होणे हा नेहमीचाच प्रकार असतो. 
 
आतापर्यंत शेकडो कामगार मृत्युमुखी 
कारखान्यासाठी लागणारे भंगार विविध राज्यातून येते. या भंगारामध्ये अनेक वेळा स्फोटकांसारख्या वस्तू, केमिकल्सचे डबे, अशा विविध वस्तू येत असतात. त्या वितविळताना अनेक वेळा स्फोट होतो. त्यानंतर भट्टीतून बाहेर येणारा लोखंडाचा रस कामगारांचा जीव घेतो, किंवा कामगारांना कायमचे अधू करून टाकतो. आतापर्यंत शेकडो कामगार याचे बळी ठरले आहेत. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

प्रकरण मिटविण्याकडे कल 
जखमी झालेल्या कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातात, ही बातमी शक्यतो बाहेर येणार नाही, याची ‘पुरेपूर’ काळजी घेतली जाते. जखमी वा मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ठराविक रक्कम देऊन प्रकरण मिटविण्यात येते. 

 अस्वस्थ वर्तमान 

कामगार अधिनियम धाब्यावर 
स्टील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करणे गरजेचे आहेत. असे असले तरीही बहुतांश स्टील कारखान्यांत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या नाहीत, कामगारांना कुठलेही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. झोपेतून उठणे आणि कामावर जाणे, कामावरून आल्यावर पुन्हा झोपणे एवढाच दिनक्रम आठ दिवस सुरू असतो. अक्षरशः जनावरांप्रमाणे काम करणाऱ्या या कामगारांकडे जिल्हा प्रशासनासह, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, औद्योगिक सुरक्षा अधिकारी डोळेझाक करतात.