

चिकलठाणा : येथील एमआयडीसी परिसरातील युनिव्हर्सल शाळेत अन्न आणि पिण्याच्या पाण्यातून ८० टक्के विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा आरोप पालकांनी गुरुवारी (ता. १४) केला. त्यानंतर शुक्रवारी (ता. १५) जिल्हा परिषद आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी चौकशीसाठी शाळेत गेले असता त्यांना शाळा प्रशासनाने अगोदर गेटवर अडवले. त्यानंतर प्राचार्यांची भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पथकाला बाहेरचा रस्ता दाखवला. शाळेच्या या मुजोरीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
काही महिन्यांपासून युनिव्हर्सल शाळा नेहमी चर्चेत आहे. शुल्कवाढी व इतर कारणांमुळे शालेय शिक्षण विभागाने शाळेची मान्यता रद्द केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना गुरुवारी शाळेत दिले गेलेले अन्न आणि पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली.
ही विषबाधा नेमकी कशी झाली, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. जी. एम. कुडलीकर, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे, आरोग्य अधिकारी बाळकृष्ण राठोडकर आपापल्या पथकांसह शाळेत गेले होते. परंतु, शाळा प्रशासनाने विषबाधा प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली. शाळेकडून मिळत असलेल्या असहकार्याच्या भूमिकेमुळे या दोन्ही पथकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, या प्रकरणाबाबत ‘सकाळ’ने शाळेच्या प्राचार्या सीमा गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. त्यावर गुप्ता यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
ठेवले दोन तास ताटकळत
शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीसाठी मुलांना देण्यात आलेल्या अन्नाचे नमुने घेतले. त्यानंतर आरोग्य कर्मचारी राजेश गाडेकर यांनाही शाळेने दोन तास बाहेर ताटकळत ठेवल्यानंतर पाण्याचे नमुने तपासण्यास परवानगी दिली. अन्न व पाण्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेची शाळेला नोटीस
या प्रकरणात महापालिका प्रशासनाने शुक्रवारी युनिव्हर्सल हायस्कूलला नोटीस पाठवली आहे. २४ तासांत लेखी खुलासा सादर करावा. या कालावधीत खुलासा प्राप्त न झाल्यास, शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. यासह गुन्हादेखील दाखल करण्यात येईल, असा इशारा नोटिशीतून देण्यात आला आहे.
अनेक मुलांना विषबाधा झाल्याचे आढळले. आम्ही याबाबत शाळेत तपासणीसाठी गेलो होतो. मात्र, तुमचे चौकशी संदर्भातील पत्र दाखवा, ओळखपत्र दाखवा असे म्हणत गेटवरच अडवले. त्यानंतर प्राचार्यांना भेटल्यानंतरही त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
- डॉ. जी. एम. कुडलीकर, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.
पोलिस प्रशासन शाळेला पाठीशी घालत आहे. येत्या २४ तासांत युनिव्हर्सल शाळेवर गुन्हा नोंद केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आमच्या स्टाइलने उत्तर देईल. नंतरच्या कायदा सुव्यवस्थेला सर्वस्वी पोलिस प्रशासन व शासकीय यंत्रणा जबाबदार असेल.
- राजीव जावळीकर, राज्य सरचिटणीस, मनविसे
युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी झालेल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी स्टेटमेंट घेणे सुरु आहे. सध्या चौकशी सुरु असून यानंतर कारवाई करण्यात येईल.
- गौतम पातारे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.