विष्णू अन् जलीलची मैत्री ‘लॉकडाउन’च्या परीक्षेतही पास!

मैत्री
मैत्री

नाचनवेल-विष्णुभाऊ अन् जलीलभाईंची टेलरिंगच्या कामादरम्यान मैत्री झाली. जलीलभाई बिहारला निघून गेले; पण मैत्रीत राज्य अन् धर्माचा अडसर कधीच आला नाही. जलीलभाईंच्या मुलाच्या निकाहाला विष्णुभाऊ वऱ्हाडी म्हणून गेले. दिवसेंदिवस मैत्री फुलतच गेली. पण कठीण काळातच मैत्रीची खरी परीक्षा असते, असे म्हणतात. अगदी तशीच वेळ लॉकडाउनने आणली. पोट भरण्यासाठी आलेला जलीलभाईंचा मुलगा सद्दाम औरंगाबादेत अडकला. त्यातच रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. गाठीशी असलेले पैसे संपले. आता काय करावे? हा प्रश्‍न मैत्रीने चुटकीसरशी सोडविला. जलीलभाईंच्या एका फोनवर विष्णुभाऊंनी त्यांच्या मुलाला पैशांची मदत तर केलीच; शिवाय धीरही दिला. 

सहा हजारांची दिली मदत
देशात असहिष्णुतेचे वारे अधूनमधून कुठेतरी वाहतच असते. पण या वाऱ्यातही ताठ मानेने उभी राहते तीच खरी मैत्री. याचीच प्रचिती आणून दिलीय आडगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील कट्टर शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी विष्णू तेजराव भोसले यांनी. रमजानचे उपवास करणाऱ्या मित्राच्या मुलाला त्यांनी आतापर्यंत दोन टप्प्यांत हातोहात सहा हजारांची मदत केलीय. 

नाशिकमध्ये झाली मैत्री 
१९८२-८४ दरम्यान नाशिक शहरात विष्णू भोसले व सद्दाम अन्सारी यांचे वडील जलील अन्सारी यांची टेलरिंग कामात मैत्री झाली. कपडे शिवण्यात पारंगत झाल्यावर दोघेही कालांतराने मूळ गावी परतले. यादरम्यान आठ वर्षांपूर्वी श्री. भोसले सद्दामच्या निकाहासाठी बिहारला गेले होते. सद्दाम इमारत बांधकामात निपुण. पण त्या राज्यात हाताला काम नसल्याने कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सद्दाम दोन महिन्यांपूर्वी ठेकेदारामार्फत सातारा-देवळाई परिसरात कामाला आला होता. काही दिवस काम केल्यावर शहर लॉकडाउन झाले. त्यामुळे हातचे काम थांबले व मूळ गावी जाता येईना. रमजानमध्ये खाण्यापिण्याचे हाल सुरू झाले. सद्दामने वडिलांना कळवून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. जलील अन्सारी यांनी तातडीने फोन करून विष्णू भोसले यांना मुलाला मदत करण्यास सांगितले. तसे एवढ्या वर्षात दोघांचे अधूनमधून फोनवर बोलणे व्हायचे पण त्यात देण्या-घेण्याचा लवलेशही नसायचा. पण आता परिस्थितीच तशी आली. 

अडचणी आल्या पण... 
जलील अन्सारी यांचा कातर आवाज विष्णुभाऊंना अस्वस्थ करून गेला. चार-पाच एकर कोरडवाहू जमिनीवर त्यांचा प्रपंच कसाबसा चालतो. पण आपली परिस्थिती बेताची असली म्हणून काय झाले? मित्राने शब्द टाकलाय, तो पाळण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, या विचाराने त्यांनी पैशांचा ताळमेळ लावला. पण लॉकडाउनमध्ये औरंगाबादमध्ये जायचे कसे? त्यामुळे विष्णूंनी बॅंकेत असलेले मावसभाऊ मनोज पवार यांची मदत घेत सद्दामचे राहण्याचे ठिकाण शोधून काढले. नंतर तातडीने गारखेडा-देवळाई शाखेतील सद्दामच्या खात्यावर तीन हजार रुपये पाठवून दिले. एवढेच करून विष्णू थांबले नाहीत तर सद्दामला रेशनची व्यवस्थाही केली. यासाठी नात्यातीलच पोलिस कर्मचारी विजय पवार यांचे सहकार्य मिळाले. पंधरा दिवसांनंतर पुन्हा जलील अन्सारी यांचा फोन खणखणला; पण वेळ चुकली. शुक्रवारची (ता. आठ) बॅंकेची वेळ संपली होती आणि नंतर दोन दिवस सुटी. त्यातच शहरातील ओळखीचे बँक कर्मचारी सुटीवर असल्याने पेच निर्माण झाला. मग विष्णू यांनी मका विक्रीनंतर परतीच्या बोलीवर उसनेपासने तीन हजार रुपये ओळखीतल्यांकडून घेतले. ते तातडीने सद्दामला पोचलेसुद्धा! 

आभार साभार परत! 
रमजानच्या काळात मिळालेली ही मदत कायम लक्षात राहील. तुमचे आभार मानावे तितके कमीच, असे उद्‍गार सद्दामच्या तोंडून निघाले. पण खऱ्या मैत्रीत आभार कसले? मी माझ्या मित्राला दिलेला शब्द खाली जाऊ दिला नाही, यातच खरे समाधान आहे, असे म्हणून विष्णुभाऊंनी सद्दाम अन् जलीलभाईंचे आभार साभार परत केले! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com