esakal | धक्कादायक...शाळाखोल्यांत कोंडले परराज्यातील मजूर!
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - गारखेड्यातील महापालिकेच्या शाळेत बंदिस्त परराज्यातील नागरिक.

मुंबईहून मध्यप्रदेशात आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या कामगार, मजुरांना पोलिसांनी औरंगाबादच्या वेशीवर अडविलेले आहे. या ५० ते साठ नागरिकांना गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत आणले. परंतु येथे कुठलेही नियम पाळलेले नाहीत. गेटला कुलूप लावलेले असून असुविधांनी हे मजूर बेहाल झालेले आहेत.

धक्कादायक...शाळाखोल्यांत कोंडले परराज्यातील मजूर!

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभारत लॉकडाऊन केल्याने अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या मजुरांना थांबवून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गारखेडा परिसरातील महापालिकेच्या शाळेत ६० कामगारांची ‘व्यवस्था’ करण्यात आलेली आहे; परंतु येथे कुठलेही नियम पाळलेले नाहीत. गेटला कुलूप लावलेले असून असुविधांनी हे मजूर बेहाल झालेले आहेत. 

वेशीवरच अडविले
मुंबईहून मध्यप्रदेशात आणि जळगावहून सांगलीला जाणाऱ्या कामगार, मजुरांना पोलिसांनी औरंगाबादच्या वेशीवर अडविलेले आहे. या ५० ते साठ नागरिकांना गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत आणले. यातील दोन ते तीन नागरिक आजारी आहेत. त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नागरिकांनी या ठिकाणाहून पळ काढू नये म्हणून शाळेच्या गेटला चक्क कुलूप लावण्यात आले आहे. या शाळेत बंदिस्त केलेल्यांसाठी पाण्याची सुविधा व्यवस्थित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पलायन करू नये म्हणून...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रत्येकाला आहे त्या जागीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र हातावर पोट असलेल्या अनेकांनी घरचा रस्ता धरला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने अनेकांनी पायीच आपल्या प्रवासाला सुरवात केली. कोणी परराज्यातील आहे, तर कोणी दुसऱ्या शहरातील. अशा मजुरांना थांबवून त्यांचे समुपदेशन करावे; तसेच त्यांचे राहणे, जेवण अशा भौतिक सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शासनाने दिल्या आहेत; पंरतु औरंगाबादेत पायी जाणाऱ्या लोकांना चक्क ‘बंदिवासा’त ठेवल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. मुंबईहून मध्यप्रदेशला आपल्या गावी निघालेल्या १४ जणांना पोलिसांनी वाळूज पंढरपूर येथे अडवले, तर जळगावहून सांगलीकडे निघालेल्या २२ लोकांना हर्सूल येथे पोलिसांनी अडवत चौकशी केली. यासह अजून दहा ते बारा भटक्यांना पकडून या सर्वांची रवानगी गारखेडा येथील महापालिकेच्या शाळेत केली आहे. तिथून त्यांनी पलायन करू नये म्हणून शाळेच्या गेटला कुलूप लावण्यात आले. 

हेही वाचा - जाॅर्डनहुन आलेले नऊ जण क्वारंटाईन

भौतिक सुविधांचा अभाव 
गारखेडा येथील या शाळेत पिण्यासाठी पाणीही पुरेसे नाही. दोन वर्ग खोल्यांमध्ये हे सर्व लोक राहत आहेत. या वर्गखोल्यांमध्ये ना गाद्या आहेत ना पांघरूण. तसेच या ठिकाणी बंदिस्त केलेल्या दोन तीन नागरिकांना ताप, कोरडा खोकला असा त्रास आहे. त्यामुळे बाकीच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आमचे कुटुंब घरी वाट पाहत आहे, त्यामुळे आमची तपासणी करावी, आमच्यात काही लक्षणे आढळ्यास बंदिस्त ठेवावे अन्यथा सोडून द्यावे, अशी मागणी हे नागरिक करीत आहेत. 

मजुरांच्या व्यथा 
चौकशी केली असता मुंबईहून आलेले सर्व लोक मुंबईत वाहनचालकाचे काम करत असून हाताला काम नसल्याने राहण्याचे आणि खाण्याची व्यवस्था नसल्याने आपण स्वगावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर जळगावहून सांगलीला जाणारे सर्व लोक जळगाव येथे मार्केटिंगचे काम करत होते. आता पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने अडचण झाली आहे. आम्हाला आमच्या घरी पोचवा, अशी विनंती या नागरिकांनी केली आहे.