esakal | लॉकडाउनने केला आखाडा चीत 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनने केला आखाडा चीत 

यात्रा बंद झाल्याने पहिलवानांचा कुस्त्यांचा सिझन गेला,  आखाडे, तालमी ओस; पहिलवानांची आर्थिक कोंडी 

लॉकडाउनने केला आखाडा चीत 

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: पहिलवान जर कुस्तीच खेळणार नसेल तर त्याने खुराकासाठी पैसे कुठून आणायचे? फक्त बाजरीची भाकर खाऊन कुस्ती कशी जिंकणार? आखाडे, तालीम बंद झालीय. पकड करता येत नाही. घरात बसून मनावर, शरीरावर परिमाण होतोय. तालीम करणारे पहिलवान व्यायामशाळा सोडून गावाकडे गेले. काही गावाकडेच घरात तालीम करतात. कुस्तीचा सिझन चार महिने असतो. आता सिझनच नाही तर पैसे कुठून येणार, ही व्यथा आहे राज्यभर कुस्तीचे आखाडे गाजविणाऱ्या रांगड्या पहिलवानांची. 

लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच यात्रा, उरूस, धार्मिक उत्सव, नियोजित कुस्ती स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे कुस्त्यांचा सिझन गेला. आता कुस्त्याच नाही तर पैसेही नाही. कुस्त्यांतून पैसे आले असते तर त्यातून खुराकासाठी काहीसा हातभार लागला असता; मात्र आता कुस्ती सोडून आपापली कामे करावी लागत आहेत. लॉकडाउनमुळे लाल मातीचे आखाडे ओस पडले. तालीम करणे शक्य नाही. त्यामुळे पहिलवानसुद्धा आर्थिक कोंडीत सापडले आहेत. करावे तर काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. 

स्पर्धेतून पहिलवानांच्या हातातून काही पैसे येतात. पैशांपेक्षा वाट्याला चांगली प्रतिष्ठा, नावपण येते. त्यामुळे कुस्तीपटू वर्षभर घाम गाळून चार महिन्यांच्या सिझनची वाट बघतात. त्यातून आपल्या खुराकाची तरतूद करतात; मात्र लॉकडाउन पहिलवानांच्या वाट्याला आर्थिक संकटे घेऊन आला आहे.

हेही वाचा- भयंकर औरंगाबादच्या ग्रामीण भागात ही कोरोनाचा शिरकाव

ग्रामीण भागातील अनेक पहिलवान कुस्ती प्रशिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली; तसेच औरंगाबादेत विविध नामांकित तालमींत प्रशिक्षण घेतात; मात्र त्यांना आता आपले आखाडे सोडून गावाकडे जावे लागले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हर्सूल, बेगमपुरा, जटवाडा, पळशी शहर, देवळाई, नायगाव, खुलताबाद, सिल्लोडसह अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मातीतील पहिलवान आहेत. 

खुराकवर लाखभर खर्च 

तालीम करताना शरीर पीळदार आणि समोरच्या पहिलवानावर मात करण्यासाठी खुराक महत्त्वाचा असतो. खुराकासाठी पैसा हवा असतो; मात्र अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते जत्रा, यात्रा, उत्सव, स्पर्धा गाजवून काही पैसे मिळवितात. पहिलवानांना रोज बदाम, काजू, दूध, तूप, फळे, अंडी, चिकन, मटण, मासे, सूप असा आहार लागतो. यासाठी लाखो रुपये खर्च येतो. आता मात्र त्यांना खुराक बंद करून शेतात काम करावे लागत आहे. काहीजण लॉकडाउनमध्ये बसून आहेत. 

मोठा पहिलवान कमावतो दीड ते दोन लाख 

यात्रा, जत्रा, उत्सवात होणाऱ्या स्पर्धेत मोठा पहिलवान दीड ते दोन लाख रुपये सहज कमावतो. काहीजण यापेक्षा जास्त पैसा मिळवितात. शेवटची कुस्ती १४ हजारांच्या पुढे असते. काही ठिकाणी ती ३०, ४० आणि पन्नास हजार रुपयांचीसुद्धा असते. एक लहान पहिलवान ३० ते ४० हजार रुपये कमावतो. हे सर्व काही तो किती कुस्ती चीतपट करतो यावर अवलंबून असते. 

ग्रामीण भागात आजही कुस्ती खेळ लोकप्रिय आहे. कोरोनामुळे यात्रा, स्पर्धा बंद असल्याने पडल्याने गरीब कुटुंबातील पदकविजेते पहिलवान मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. शासनस्तरावरून सहकार्य झाल्यास कुस्तीकलेची जोपासना होईल. आता व्यायामशाळा बंद आहे. सगळी पोरं घरी गेली. आता खुराकासाठी पैशाचे टेन्शन आहे. 
- नवनाथ औताडे, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य-कांस्यपदक विजेते 

सहा महिने कुस्तीचा तालमीत सराव करून पुढील सहा महिने यात्रा, स्पर्धांत कमाई करून आपल्या खुराकाची सोय केली जाते. लॉकडाउनमध्ये सगळे पहिलवान घरीच बसून आहेत. आता सिझन गेला. कमाईचे इतर पर्यायसुद्धा नाहीत. मी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. खुराकासाठी पैसेच नाहीत. मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत २०१६-१७ या वर्षात ७० किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले होते. 
- अश्‍फाक शाह, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदकविजेते पहिलवान 

कोरोनामुळे छोट्या-मोठ्या पहिलवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर होतकरू, जिल्हा, राज्यपातळीवरील मल्लांना आर्थिक सहकार्याची गरज आहे. काही पहिलवान मानसिक तणावात आहेत. त्यांच्यासमोर सर्वांत मोठ प्रश्‍न खुराकाचा आहे. मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत २०१८ मध्ये रौप्य, २०१८-१९ मध्ये कांस्यपदक जिंकले, औरंगाबाद-जालना केसरी स्पर्धा जिंकली; मात्र आता लॉकडाउनमुळे बसून आहे. 
- अजहर पटेल, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदकविजेते पहिलवान 
 

loading image