औरंगाबादच्या विकासासाठी लागणार तब्बल 1,315 कोटी रुपये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

आमदार अंबादास दानवे यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या कामांसंदर्भात बैठक घेतली असता, सुमारे 1,335 कोटी रुपयांची यादी देण्यात आली. त्यात केंद्र शासनाकडील कामांचाही समावेश आहे. 

औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शहरातील विकास कामे ठप्प आहेत. शासन निधीवरच महापालिकेची सध्या मदार आहे तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा शासन निधी अखर्चित असल्याचे चित्र आहे. असे असले तरी विविध कामांसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी (ता. 14) आमदार अंबादास दानवे यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या कामांसंदर्भात बैठक घेतली असता, सुमारे 1,335 कोटी रुपयांची यादी देण्यात आली. त्यात केंद्र शासनाकडील कामांचाही समावेश आहे. 

महापौरांच्या दालनात श्री. दानवे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, की विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे अधिवेशनात प्रश्‍न मांडण्यासाठी आढावा बैठक घेत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार आहेत. आम्ही एकत्र येऊन प्रश्‍न मांडल्यास शासनाकडील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागू शकतात. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी विभागनिहाय माहिती श्री. दानवे यांना दिली. संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी यापूर्वी शासनाने निधी दिला आहे. उर्वरित निधी मिळावी अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

त्यावर त्यांनी आठ कोटी रुपयांचा निधी कला संचालनालयाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. सातारा-देवळाई, नवी पाणी पुरवठा योजना, 250 कोटींचा रस्ते निधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविणे, घन कचरा व्यवस्थापनासाठीचा उर्वरित निधी, स्मार्ट सिटी, घरकूल योजना, बीओटी प्रकल्प, आकृतिबंध, दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांना कायम करणे, अग्निशमन केंद्र उभारणी, महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा दानवे यांनी घेतला. बैठकीला सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर स्मिता घोगरे, मनीषा लोखंडे, आयुक्त आस्तिककुमार पांडेय व महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

पाणी योजनेला नाही स्थगिती 
पाणीयोजनेला स्थगिती दिल्याची अफवा पसरवली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेली निविदा भरण्याची अंतिम मुदत 22 डिसेंबर आहे. यासंदर्भात आम्ही काय करायचे? अशी विचारणा प्राधिकरणाने शासनाकडे केली आहे. यासंदर्भातील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, अशी भूमिका महापौरांनी मांडली. त्यावर श्री. दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी पाणी योजनेला स्थगिती दिली नसल्याचे नमूद केले, असे दानवे यांनी सांगितले. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

झाडे न तोडता स्मारक 
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक एकही झाड न तोडता उभारले जाईल, असे दानवे यांनी सांगितले. त्यापूर्वी महापालिकेने या जागेला संरक्षक भिंत बांधावी. या ठिकाणी सध्या वाहनांची पार्किंग केली जात आहे. त्यासाठी झाडे तोडली तर महापालिकेची बदनामी होईल, असेही श्री. दानवे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad's development will cost Rs 1,315 crore