बीड जिल्ह्यात कोरोनाने नाही...या कारणाने ग्रामस्थांवर रडण्याची वेळ

water problem
water problem

केज (जि. बीड) - तालुक्यातील लाडेवडगाव येथे पाणी टंचाई जाणवत असल्याने पाण्यासाठी महिलांना रात्री-बेरात्री घागरी रांगेत लावण्यासाठी शाळेच्या बोअरवर जावे लागत आहे. सद्यःपरिस्थितीत कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच पाणीटंचाई असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर नाइलाजाने महिलांना पाणी आणण्यासाठी पडावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर टँकर सुरू करण्याची मागणी गावातील महिलांकडून केली जात आहे. 

तालुक्यातील लाडेवडगाव या साधारणतः साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. काही काळ विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार भाऊसाहेब शेप यांचे गाव अशी ओळख या गावाची आहे. मागील पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे शिवारातील जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.

मागील पाच-सहा वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेतून राबविलेल्या पाणीपुरवठा योजनेद्वारे या गावास पाणीपुरवठा केला जात होता; मात्र पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या योजनेतून पावसाळा व हिवाळा हंगामात पाणीपुरवठा होतो. उन्हाळा सुरू झाला, की या योजनेच्या विहिरीचे पाणी आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्याही पाणीटंचाईने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. सध्या गावातील जनतेची तहान भागविण्याची मदार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या बोअरवर अवलंबून आहे. 

सध्या कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी काळात सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. पाच घागरी मिळविण्यासाठी मध्यरात्रीच घागरी रांगेत लावण्यासाठी शाळेच्या आवारात जावे लागते. प्रशासनाचा सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजण्याचा वेळ संपला, की पाणी बंद करावे लागते. त्यामुळे अनेकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक महिला रात्री-अपरात्री घागरी रांगेत लावण्यासाठी शाळेच्या आवारात जातात. उन्हाळ्यातील खऱ्या पाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा योजनेच्या नळाला पाणी येत नाही. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेची 'असून अडचण नसून खोळंबा' अशीच अवस्था झाली आहे. सध्याची पाणीटंचाईची बिकट स्थिती विचारात घेऊन प्रशासनाने तातडीने पाणी टँकर सुरू करण्याची मागणी गावातील महिलांकडून केली जात आहे. 

टँकरचा प्रस्ताव नाही 
सध्या प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. 

गावात शाळेच्या एकाच बोअरला पाणी आहे. त्यामुळे गर्दी असल्याने निम्या रात्री येऊन घागरी बारीला लावाव्या लागतात. घागरी रांगेत लावून आम्ही अंतर ठेवून उभा राहतो. त्यातच एका कुटुंबाला पाचच घागरीचा नियम आहे. पाच घागरी पाण्यातच सगळ्यांचं भागवावं लागतंय. शासनाने टँकर सुरू केलं तर बरं होईल. 
-रेखा लोंढे, ग्रामस्थ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com