बाबासाहेबांच्या संस्था, विचार वाढविण्याची गरज : राजरत्न आंबेडकर

बाबासाहेबांच्या संस्था, विचार वाढविण्याची गरज : राजरत्न आंबेडकर

हिंगोली : जगात जपान, चायना, इंडोनेशिया, श्रीलंका असे दीडशेपेक्षा जास्त बौद्धराष्ट्र आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्माची व्याप्ती मोठी आहे. परंतु, येथील बौद्ध अनुयायांना अजून हे उमजलेले नाही. उलट आरएसएसच्या माध्यमातून अनेक बौद्ध भिक्खू तयार केले जात असल्याचा आरोप करत बौद्ध धम्म वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांसह त्यांनी स्थापन केलेल्या संस्था वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केले.

हिंगोली येथील महावीर भवनमध्ये बौद्ध सांस्कृतीक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत शुक्रवारी (ता.१७) ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय बौद्ध धम्मात होत असलेली घुसखोरी आणि भारतातील बौद्धांची उदासीनता’ या विषयावर राजरत्न आंबेडकर बोलत होते. अध्यक्षस्‍थानी डॉ. शत्रुघ्न जाधव होते. उदघाटक म्हणून जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी; तर प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, दिनेश हनुमंते यांची उपस्‍थिती होती. 

बौद्ध धम्मात नकली लोकांकडून घुसखोरी

या वेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय बौद्ध धम्मात नकली लोकांकडून घुसखोरी केला जात आहे. दुसरीकडे मात्र भारतातील बौद्ध बांधवांची उदासीनता दिसून येत आहे. आज भारतात बौद्धांची संख्या शून्य टक्के आहे. कारण जनगणनेच्या आकड्यांनुसार तसे केले गेले आहे. आजही येथील बौद्ध हा स्वतःला दलित म्हणून घेताना लाजत नाही.

 जगात भारताची बौद्ध राष्ट्र म्हणून ओळख

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला स्वाभिमानी बौद्ध धम्म नावारूपास आलेला नाही. अनेकांनी खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म स्वीकारलेला नाही. हिंदू देवी, देवता व चालीरीतीचा ते त्याग करू शकले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देश असल्याची आहे. भारत हे बौद्ध राष्ट्र म्हणून विविध देशांकडून मोठ्या प्रमाणावर देशासाठी निधी मिळविला जातो.

अनुयायीच ओळख विसरले

परंतु, त्यांचे अनुयायीच ही ओळख विसरले असून येथील बौद्धांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी होऊन बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आरपीआय या तिन्ही संस्था वाढविण्याचे काम येथील बौद्धांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्‍पूर्वी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मनोगत व्यक्‍त केले. या वेळी समाजभूषण मधूकर मांजरमकर यांचा सत्‍कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुखदेव बलखंडे यांनी केले. सूत्रसंचलन कैलास भुजंगे यांनी केले. प्रा. डॉ. सचिन हटकर यांनी आभार मानले.

‘सीएए’ व ‘एनआरसी’विरुद्ध देशव्यापी आंदोलन

या वेळी राजरत्न आंबेडकर म्हणाले, देशात सध्या संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालून ‘सीएए’ व ‘एनआरसी’ हे कायदे केले जात आहेत. परंतु, केंद्रातील सत्ताधारी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आज संपूर्ण देशभर संविधान प्रेमी या कायद्याचा विरोध करीत आहेत. सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व विचार घेऊन आंदोलन लढताहेत. परंतु, आता केवळ आंबेडकरांचा फोटोच नव्हे तर आंबेडकर घराणेही या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहे. या महिन्याच्या अखेरीस देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com