Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप

सुषेन जाधव
Wednesday, 18 December 2019

शहरासह ग्रामीण भागात दिव्यांग महिला व पुरुष संसाराचा गाडा हाकण्यासाठी रस्त्यावर वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. असे व्यवसाय करण्यासाठी ज्यांना मदतीची खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यांना संबंधित व्यवसाय करण्यासाठीचे साहित्य देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : दिव्यांग व्यक्ती भीक मागण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करताना दिसतात. आपल्या अवतीभोवती रोजच अशी काही उदाहरणं आपण पाहत असतो. अशा व्यक्तींना गरज असते, ती उभारी देण्याची. औरंगाबादेतील बजाज ऑटो कंपनीतील रिक्षा विभागातील साधारण पाचशे कर्मचाऱ्यांनी वर्षभरातील सर्वांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून लाखभर रुपये जमा करत दिव्यांगांचा संसार उभा करण्याचा संकल्प केला आहे. साधारण दहा दिव्यांगांना ही मदत केली जाणार आहे. 

बजाज कंपनीतील कर्मचारी दत्ता वाकडे यांनी सांगितले की, दिव्यांगांना आम्ही ही मदत करत नाहीत, तर त्यांना उभा करण्यासाठी हातभार लावतो आहोत. शहरासह ग्रामीण भागात दिव्यांग महिला व पुरुष संसाराचा गाडा हाकण्यासाठी रस्त्यावर वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. असे व्यवसाय करण्यासाठी ज्यांना मदतीची खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यांना संबंधित व्यवसाय करण्यासाठीचे साहित्य देण्यात येणार आहे. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

काय असेल उपक्रमाचे स्वरुप 

औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील दिव्यांग जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत, मात्र पुरेशा साधनाअभावी व्यवसाय करता येत नाही अशांना साहित्यरुपी मदत केली जाणार आहे. दिव्यांगांना प्रत्यक्ष पैसेरुपात मदत नाही तर, त्यांचा संसार उभा करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. हीच गरज बजाज ऑटो कंपनीतील रिक्षा विभागात कार्यरत "रिक्षा फायनल असेम्बली ग्रुप'ने ओळखली आणि साधारण पाचशेवर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत वाढदिवसाचा खर्च टाळून जमा होणारी साधारण लाखभर रुपये रक्कम याकामी खर्च करणार असल्याचे श्री. वाकडे म्हणाले. काही गरजू दिव्यांगाची यादीही त्यांनी तयार केली असून चार ते पाच दिवसात हा कार्यक्रम होणार असल्याचे श्री. वाकडे म्हणाले. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

रिक्षा फायनल असेंब्ली ग्रुपचे कार्य 

बजाज कंपनीतील रिक्षा विभागात काम करणाऱ्या पाचशे कर्मचाऱ्यांचा रिक्षा फायनल असेम्बली ग्रुप या नावाने ग्रुप आहे. पाचशेवर कर्मचाऱ्यांचे वर्षभरात विविध तारखेत वाढदिवस येतात, आजवर कंपनीत विविध मिठाई वाटप करुन वाढदिवस साजरे केले जात होते. मात्र 2012 पासून हा ग्रुप आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी अनाथाश्रमातील वृद्धांना विविध साहित्यरुपी मदत देणे, अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच बीड जिल्ह्यातील एडसग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे. यंदा मात्र यात बदल करत दिव्यांगांना उभारी देण्याचे कार्य करण्यात येत असल्याचेही श्री. वाकडे म्हणाले. 

यांना संपर्क करता येईल 

औरंगाबाद शहरासह ग्रामीणमधील गरजू अपंगांविषयी कळविण्याचे आवाहनही दत्ता वाकडे 7709815476 व शिवाजी गाडे 9730892750 यांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
हे उघडून तर पहा : विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Auto Workers Helping Handicapped People in Aurangabad