गोवंश हत्या बंदी कायद्याची ऐशी की तैशी 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 26 April 2020

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ गोवंशाची सुटका, अर्धापूर व बिलोली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा. जप्त गोवंश गोशाळेत दाखल.

नांदेड : राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागु असतानाही अवैध्यरित्या गोवंशांची कत्तल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या चोरीच्या मार्गाने जाणाऱ्या नऊ गोवंशाची सुटका पोलिसांनी केली. याप्रकरणी अर्धापूर आणि बिलोली पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना अटक करून वाहनं जप्त केली. 

अर्धापूर तालुक्यातील भोगाव ते कामठा (गणपूर) मार्गाने अवैधरित्या कत्तलीसाठी एका टेम्पोमध्ये गोवंश जात असल्याची माहिती अर्धापूर पोलिसांना मिळाली. यावेळी सहाय्यक फौजदार नारायसिंग रघुवंशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भोगाव ते कामठा रस्त्यावर सापळा लावला. शनिवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास छोटा हत्ती ( एमएच२६-एच-९९४३) समोरून येताच त्यांनी थांबविला.

हेही वाचा - Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

चालकास ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता आत एक बैल, एक म्हैस आणि एक रेडा अशी तीन जनावरे निर्दयीपणे बांधून आढळली. त्याबद्दल चालकाकडे कुठलाच पुरावा नव्हता. ही जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. वाहनासह जनावरे जप्त करून अर्धापूर पोलिस ठाण्यात आणले. नारायणसिंग रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. पानपट्टे करत आहेत.

सावळी पांदन रस्‍त्यावर कारवाई

तर दुसऱ्या घटनेत बिलोली तालुक्यातील सावळी पांदन रस्त्याने टेम्पो (एमएच२६-बीई-२०५४) मधून गोवंश कत्तलीसाठी विनापरवाना वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी लगेच सहाय्यक फौजदार जनार्धन बोधणे यांच्या पथकाला सतर्क केले. पथकांनी गुप्त माहितीवरुन सावळी पांदन रस्त्यावर सापळा लावून गोवंशाची वाहतुक करणारा टेम्पो पोलिसांनी अडविला. 

हे देखील वाचाच - कोरोना : ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी-आशा सेविकांची वाट बिकट

बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्याची तपासणी केली असता आतमध्ये दोन गायी, दोन कालवड, दोन गोऱ्हे आणि दोन दुचाकी आढळून आल्या. बहुतेक हे सर्व गोवंश चोरी करून कत्तलीसाठी जात होते. आरोपी मात्र याबाबत माहिती लपवित होते व त्यांनी तोंडावर मास्क लावले नव्हते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. जनार्धन बोधणे यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन १९९५ व कलम ११ (ध)(५), जनावरास क्रुरपणे वागवणे प्रतिबंधात्मक अधिनियम १९६० व भादवीच्या कलम १८८, ३४ सह कलम ५ (बी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. शिंदे करत आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on cow slaughter nanded crime news