बीडचे धक्कादायक प्रकरण- सलाईनच्या बाटल्यांची ती बॅचच सदोष 

दत्ता देशमुख
Tuesday, 21 April 2020

शासकीय रुग्णालयांत पुरवठा केली गेलेली ही डेनिस केम लॅब कंपनीची सलाईनच दर्जाहीन असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आले आहे. यामुळे कंपनीने या बॅचमध्ये निर्मिती केलेल्या सर्वच बाटल्या तशा दर्जाहीन असल्याचे समोर आल्याने शासन या कंपनीवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 

बीड - रुग्णाच्या शरीरातील कमी झालेले द्रव घटक भरून काढण्यासह सलाईन थेट नसेतून रक्तात जात असल्याने औषधी द्रवही देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सलाईनमध्ये चक्क शैवाल आढळल्याचा प्रकार ‘सकाळ’ने समोर आणला होता. शासकीय रुग्णालयांत पुरवठा केली गेलेली ही ‘डेनिस केम लॅब’ कंपनीची सलाईनच दर्जाहीन असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आले आहे.

कंपनीने या बॅचमध्ये निर्मिती केलेल्या सर्वच बाटल्या तशा दर्जाहीन असल्याचे समोर आल्याने शासन या कंपनीवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. ‘डेनिस केम लॅब’ या उत्पादक कंपनीचे १८०७०१७१४२ या क्रमांकाच्या बॅचच्या सलाईनच्या बाटलीची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपणार आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस येथील जिल्हा रुग्णालयात या बाटलीतील द्रवात मोठ्या प्रमाणावर शैवालाचे घोष आढळून आले.

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

सकाळ’ने हा प्रकार समोर आणल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविले होते. त्यात उत्पादनात दर्जा सांभाळला गेला नसल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने अहवालात दिल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न निरीक्षक श्री. डोईफोडे यांनी सांगितले. दरम्यान, ‘सकाळ’ने शैवाल असल्याचे उघड केल्यानंतर या कंपनीकडून पुरवठा झालेले संबंधित बॅचच्या सलाईनचा वापर थांबविण्यात आला हेाता. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

कारवाई करणार की पाठीशी घालणार? 
अगोदरच शासकीय पुरवठ्यांबाबत असे प्रकार घडत असल्याने सरकारी दवाखान्यांतील गोळ्या-औषधे घेण्याचे रुग्ण टाळण्याचे प्रकार घडतात. आता चक्क बाटलीत शैवाल आढळल्याने रुग्णांचा विश्वास कसा राहणार, असाही प्रश्न आहे. असे दूषित घटक रक्तात गेल्यानंतर पायोजेनिक इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. रुग्णाला इनाथायलाईटिक शॉक बसू शकतो. २०१६ मध्ये हैद्राबाद येथे असा प्रकार घडला होता.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

परभणी आणि काही वर्षांपूर्वी बीडमध्ये नेत्रशस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना इन्फेक्शन झाल्याचे प्रकार घडले होते. तो प्रकारही अशा दूषित सलाईनमुळेच घडला होता. आता कंपनीचे निर्मित सलाईन दर्जाहीन असल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य विभाग याला पाठीशी घालणार, की लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर काही कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. 
 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That batch of saline bottles is defective