esakal | बीडमध्ये लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

बीडमध्ये लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: मंजूर झालेले स्वस्त धान्याचे नियतन उपलब्ध करुन देण्यासाठी रेशन दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी (ता. १५) दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, २४ तासांत लाच प्रकरणी शहरात तिघांवर गुन्हे नोंद झाले. तीनही गुन्हे बीड शहरात दाखल झाले. यातील दोघे तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातीलच आहेत.

तालुक्यातील एका धान्य दुकानदाराला शासनाकडून दर महिन्याला निर्धारित केलेले धान्य नियतन मिळत नव्हते. याबाबत संबधिताने पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे याच्याकडे पाठपुरावा केला. मंजूर नियतन देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागणी करण्यात आली. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयातच सापळा रचण्यात आला.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

रेशन दुकानादाराकडून लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निरीक्षक रवींद्र ठाणगेला पकडले. दरम्यान, माजी सैनिक असलेल्या ठाणगेचा पैसे घेतानाचा व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढला होता. अखेर तो लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अलगद अडकला. उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये पुढल्या दोन आठवड्यात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

दरम्यान, लाच घेताना पकडलेल्या शाखा अभियंत्यास गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा निरीक्षक राजकुमार पाडवी याने दोन लाख रुपये तर त्याचा लेखणिक अंमलदार प्रदीप वीर याने ५० हजाराची लाच मागितल्याचा प्रकार सोमवारी (ता. १४) येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी जमीलोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी दुपारी पुरवठा विभागातील निरीक्षक दहा हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात अडकला.

loading image