बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कोरोना आणि वाळू तस्करांशीही लढा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न घालून देणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या धामधुमीतही अवैध वाळूवर कारवाई केली. या कारवाईने वाळूमाफियांत खळबळ तर उडालीच; शिवाय स्थानिक महसूल आणि पोलिस यंत्रणेचेही पितळ उघडले पडले.

बीडला जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावर रुजू झाले आणि त्यांनी सुरवातीला प्रशासनाची साफसफाई करून १२ वी बोर्डाच्या परीक्षांचाही कॉपीमुक्तीचा पॅटर्न सुरू केला. अख्ख्या परीक्षा केंद्रांवर नियुक्त पर्यवेक्षकांसह महसूल व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचे बैठे पथक नेमले. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंदचे आदेश देत सुरू ठेवणाऱ्यांवरही प्रथमच थेट गुन्हे नोंदविले गेले. विशेष म्हणजे त्यांनीही परीक्षा केंद्रांना स्वत: भेटी दिल्या. या पॅटर्नमध्ये त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची मोलाची साथ लाभली.

कॉपीमुक्तीचा परीक्षा पॅटर्न यशस्वी होतो न होतो तोच कोरोनाचा कहर निर्माण झाला. सर्वाधिक स्थलांतरितांचा जिल्हा असलेल्या बीडला कोरोनाचा धोका अधिक होण्याचा संभव होता; परंतु त्यांनी महसूल, ग्रामविकास, गृह व आरोग्य विभागाची योग्य सांगड घालून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा असा पॅटर्न उभारला की अद्याप तरी कोरोना जिल्ह्याची वेस पार करून शकलेला नाही. या पॅटर्नमध्येही त्यांना अजित कुंभार, हर्ष पोद्दार यांची तेवढीच कमालीची साथ मिळत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सुरू असलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या उपाय योजनांची खरी जबाबदारी गृह विभागावर आहे. काही तक्रारी वगळता हर्ष पोद्दार यांच्या पोलिस टिमने ही जबाबदारी आतापर्यंत चोख पार पाडली आहे. तर, बाहेरून येणाऱ्यांची चेकपोस्टवर आरोग्य तपासणीही राज्यात बीडमध्येच झाली. सीईओ अजित कुंभार यांची संकल्पना यात चांगली कामी आली.

दरम्यान, टिम लिडर म्हणून राहूल रेखावार यांच्या आदेशाबरोबरच समन्वयामुळे आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना चोख असल्याने कोरोला जिल्ह्याची वेस पार करता आलेली नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत भविष्यात उपचाराच्या नियोजनाचे काम करत असतानाच टंचाई, स्वस्त धान्याचे वितरण हे देखील महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांनी सुरवातीलाच स्वत: एका गोदामावर जाऊन स्वत: स्वस्त धान्याची तपासणी केली. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. तरीही काही फरक न पडलेल्या १७ स्वस्त धान्य दुकानांच्या परवान्यांचे आतापर्यंत निलंबनही झाले आहे.

नेमक्या याच धामधुमीत प्रशासन व्यस्त असताना वाळूमाफिये मात्र सक्रीय झाले. तसे स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाचा या माफियांना वरदहस्त लपून नाही. त्यामुळे योग्य तो मेसेज देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथे स्वत: छापा टाकून गोदावरीतून उपसा केलेला अवैध वाळूसाठा नष्ट (नदीपात्रात पांगवून) केला. यामुळे स्थानिक महसूल व पोलिसांचे पितळही या निमित्ताने उघडे पडले. दरम्यान, राहुल रेखावार यांनी आतापर्यंत स्थळपाहणी आणि तपासणी व कारवाईसाठी बाहेर पडल्यानंतर त्याची माहिती फक्त प्रशासनाच्या वहित केली परंतु त्याचा प्रपोगंडा मात्र होऊ दिला नाही. अद्याप त्यांच्या एकही पाहणीचे फोटो बाहेर आलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com