coronavirus - बीड जिल्ह्यात ऊसतोड मजूर येणार, पण अलगीकरण कक्षात राहणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माजलगाव (जि. बीड) -  कोरोनाच्या धर्तीवर केलेल्या लॉकडाउनमुळे परजिल्ह्यात अडकून पडलेल्या ऊसतोड मजुरांच्या घरवापसीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर गावात येणाऱ्या ऊसतोड मजुरांना अलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार आहेत. रविवारी (ता. १९) परभणी जिल्ह्यातून २३ मजूर जिल्ह्यात आले असून भाटवडगाव (ता. माजलगाव) येथील १७ मजुरांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

कोरोनाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी मागील २५ दिवसांपासून लॉकडाउन असल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. जिल्ह्याच्या सीमा सील केल्याने अनेक ऊसतोड मजूर परजिल्ह्यात अडकून पडले होते. तेथील कारखाना, जिल्हा प्रशासनाने त्यांची व्यवस्था करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले, तरी उघड्यावर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांचे मात्र मोठ्याप्रमाणात हाल होत होते. आठ दिवसांपासून मराठवाड्यात विजेच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतात राहणाऱ्या ऊसतोड मजुरांचे जगणे मुश्कील झाल्याने त्यांना घरी पाठविण्याची मागणी होऊ लागली. याची दखल घेत राज्य शासनाने शुक्रवारी (ता. १७) अडकलेल्या मजुरांना स्वगृही आणण्याचा निर्णय शासनाने घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आरोग्य तपासणी करून ऊसतोड मजुरांना पाठविण्यात येत असले, तरी त्यांना घरात प्रवेश मिळणार नाही. आल्यानंतर आरोग्य प्रशासन त्यांची तपासणी करून खबरदारी म्हणून त्यांना पुन्हा पुढील आदेशापर्यंत अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. गावाबाहेर त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रविवारी (ता. १९) परभणी जिल्ह्यातील २३ ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यात दाखल झाले असून, यातील १७ जण माजलगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. 

परजिल्ह्यात गेलेले १६ मजूर शनिवारी (ता.१८) गावात आले असून डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना केशवराज मंगल कार्यालयात अलगीकरण कक्षात ठेवले आहे. 
- शिवकन्या श्रीकृष्ण कुटे, सरपंच, भाटवडगाव. 

परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक ऊसतोड मजुरांची जिल्ह्याच्या हद्दीवरील चेकपोस्टवरच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून त्यांचे अलगीकरण करण्यात येणार आहे. 
- डॉ. अनिल परदेशी, तालुका आरोग्य अधिकारी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com