बीड ठरेल पर्यटन पंढरी ! जिल्ह्यातील 'ही' ठिकाणे पर्यटकांना घालतात भुरळ

beed part.jpg
beed part.jpg

बीड : जिल्हा हा अनेक संत, महात्मे आणि महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. अनेक धार्मिक, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक ठेवा जिल्ह्यात आहे. या पर्यटनाला चालना मिळाली तर जिल्हा पर्यटनपंढरी म्हणून नावारूपाला येऊ शकतो. 


एकाच खेपेत धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, पर्यटनस्थळांची सैर जिल्ह्यात करता येऊ शकते. काही स्थळे तर पुराणाच्या दृष्टीने देशात नावाजलेलीदेखील आहेत. शासनाने याकडे लक्ष दिले तर जिल्हा पर्यटनपंढरी म्हणून नावारूपास येईल. 

बीड परिसरात काय पाहाल  
बीड शहरातील कंकालेश्वरचे पाण्यातील मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना तर आहेच; तसेच हे शिवालयही आहे. शहरातच शहेंशाहवली व मन्सुरशहा दर्गासुद्धा प्रसिद्ध असून शहराच्या पूर्वेला खंडोबाचे मंदिर आणि दीपमाळदेखील प्रसिद्ध आहे. शहरातील शनिमंदिर देशातील साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते; तसेच खासबाग देवी, महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर, परिसरात १५ किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध मन्मथस्वामींचे समाधीमंदिर निसर्गाच्या सान्निध्यात असून, या ठिकाणचा धबधबाही प्रसिद्ध आहे. बाजूलाच मांजरसुंबा येथे पोईचा देव मंदिर आहे. बीड शहरापासून जवळच प्रसिद्ध खजाना विहीरदेखील आहे. लिंबागणेशला प्रसिद्ध गणपती मंदिर व शून्याचा शोध लावणाऱ्या भास्कराचार्यांची समाधी आहे. तर शहराजवळ थोड्याच अंतरावर श्रीक्षेत्र नवगण राजुरी व नामलगाव ही प्रसिद्ध गणपती मंदिरे आहेत. गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतीरावरील राक्षसभुवन येथील शनी महाराज देवस्थानदेखील प्रमुख पीठांमधील एक मानले जाते. याच परिसरात एकमुखी दत्त, विज्ञान गणेश, विज्ञानेश्वर महादेव, विष्णुपदस्थान, नृसिंह मंदिर व पंचाळेश्वर अशी मंदिरेही आहेत. परिसरातच काही अंतरावरील पाटोदा तालुक्यातील मयूर अभयारण्य हे देशातील एकमेवर मोरांचे अरण्य आहे. याच तालुक्यात सौताडा येथेही उंचावरून कोसळणारा धबधबा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील प्रसिद्ध रामेश्वराचे मंदिर असा दर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. याच तालुक्यात पिंपळवंडी येथे अश्वलिंगाचे हेमाडपंथी मंदिर असून, महादेवाची स्वयंभू पिंड व गाभाऱ्यात शंकर-पार्वतीची मूर्ती आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अंबाजोगाई-परळीत धार्मिक-पर्यटनाची रेलचेल 
अंबाजोगाईत कोकणस्थांची कुलदेवता योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र तसेच मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज व पासोडीकार सर्वज्ञ दासोपंत यांचे समाधीमंदिर आहे. अमृतेवश्वर, सकलेश्वर (बाराखांबी), खोलेश्वर, काशिविश्वनाथ, पापनाश, नागनाथ मंदिर आदी ३० मंदिरे व वैद्यऋषी बुट्टेनाथांचे स्थान; तसेच वैष्णव व जैन लेण्यांचे प्रमुख ठिकाण असलेले हत्तीखानाही शहराजवळ आहे. इतिहासाची साक्ष देणारे शीलालेखही आहेत. हा परिसर बालाघाटाच्या रांगेत असल्याने विविध दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्यही पाहता येऊ शकते. पावसाळ्यात हे दृश्‍य मिनी महाबळेश्वरचा फील देतो. १७ किलोमीटर अंतरावरील परळी येथे देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथाचे मंदिर आहे. शहराजवळच जगमित्रनागा मंदिर, दक्षिणमुखी गणपती मंदिर, वेताळमंदिर, रत्नेश्वर मंदिर, राजा चालुक्य राजवटीच्या काळातील धर्मापुरी येथे भुईकोट किल्ला आहे. तपोवन मंदिर, पापदंडेश्वर मंदिराचे दर्शनही पर्यटकांना घेता येऊ शकते. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
धारूरचा प्रसिद्ध भुईकोट किल्ला 
सोन्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या किल्लेधारूरला राष्ट्रकुटांनी बांधलेला धारूरचा येथे किल्लाही पाहता येईल. किल्ल्याचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असून आतमध्ये गोडी दिंडी आहे. बाजूलाच तलाव व खंदकही आहे. किल्ल्यासह परिसरात अंबाचोंडी मंदिरासह, आद्यकवी उद्धव चितगन समाधी, नाथ बाबांचा मठ, धारेश्वर (जैन) हेमाडपंथी मंदिर, बालाघाटातील गैबी बाबा पीर, किल्लेदाराचा मकबरा, पाटील गल्लीतील बारा कमान दरगाह व अन्वरशाह पीर. 

ही स्थळेही येतील पाहता 
माजलगाव परिसरात दक्षिण काशी व बरेच काही तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे पुरातन व हेमाडपंथी मंदिर आहे. अधिक मासाच्या महिन्यात यात्रोत्सव असतो. शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीकाठावर मंजरथ हे पुरातन क्षेत्र असून, दक्षिण काशी अशी या गावाची ओळख आहे. सिंधफणा व गोदावरी नदीच्या संगमावर वसलेल्या गावात नदीचा त्रिवेणी संगम असल्यामुळे व नदीकाठी महादेवासह विविध मंदिरे आहेत. या ठिकाणी अहल्याबाई होळकर यांनी ३५० वर्षांपूर्वी ८०० फूट लांब, ५५ फूट रुंद असा बारव बांधलेला आहे. 
याच तालुक्यात श्रीक्षेत्र गंगामसला येथील गणपतीही प्रसिद्ध आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com