गर्भलिंगनिदान - बीडच्या डॉक्टरला दोन वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातील एका डॉक्टरला  दोन वर्षांची सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 2010-12 च्या दरम्यान स्त्रीभ्रूण हत्या आणि गर्भलिंगनिदानाच्या अनेक घटना समोर आल्या. त्या वेळी स्त्री जन्मदरही घटला होता.

बीड -  गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत एका महिलेच्या गर्भातील बाळाच्या लिंगाची ओळख उघड केल्या प्रकरणी शहरातील डॉ. राजेंद्र ढाकणे यास गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार दोषी ठरवत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटीया यांनी मंगळवारी (ता. सात) हा निकाल सुनावला. 

जिल्ह्यात 2010-12 च्या दरम्यान स्त्रीभ्रूण हत्या आणि गर्भलिंगनिदानाच्या अनेक घटना समोर आल्या. त्या वेळी स्त्री जन्मदरही मोठा घटला होता. दरम्यान, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या प्रकाराविरोधात कडक मोहीम उघडली. त्यांनी स्वत: अनेक सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर छापे मारले होते.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

ऑक्‍टोबर 2011 मध्ये दिल्लीच्या समितीने डॉ. राजेंद्र ढाकणे याच्या सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी केली. यात, अनियमितता आढळून आल्याने समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना सविस्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

या वेळी रुग्णालयात सोनोग्राफी केलेल्या महिलांची माहिती विहित नमुन्यात ठेवल्याचे समोर आले तसेच एका महिलेच्या नावासमोर सांकेतिक शब्दात गर्भलिंग निदानाचा उल्लेख आढळला होता. त्यानुसार डॉ. राजेंद्र ढाकणे विरुद्ध बीडच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी जे. एस. भाटिया यांच्यासमोर चालले.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

यात डॉ. गौरी राठोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने या प्रकरणात डॉ. राजेंद्र ढाकणे यास दोषी ठरवत विविध कलमांखाली दोन वर्षांची सक्तमजुरी आणि 12 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. बी. एस. कदम यांनी काम पाहिले. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

आयएमएला कळविण्याचे निर्देश 
डॉ. राजेंद्र ढाकणे यास सक्तमजुरीची शिक्षा झाल्याची माहिती इंडियन मेडिकल कौन्सिलला कळविण्याचेही या निकालात नमूद केले आहे. यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक आयएमएला ही माहिती कळवतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Doctor Sentenced To Two Years Rigorous Imprisonment