बीड: अतिवृष्टीग्रस्त भागाची पंकजा मुंडेंनी केली पाहणी । pankaja munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

munde

बीड: अतिवृष्टीग्रस्त भागाची पंकजा मुंडेंनी केली पाहणी

परळी वैजनाथ : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या तालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता.28) भरपावसात दौरा केला. गावात जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

तालुक्यात सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे.

ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यातील हे विदारक चित्र पाहून पंकजा मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखलातून रस्ता काढत नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

हेही वाचा: औरंगाबादेत मुसळधार, बजरंग चौकात पुन्हा साचले तळे

जिल्हयातील शेतकरी सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्हयात येऊन गेले पण ते शेतकऱ्यांसाठी कुठेही गाडीतून खाली उतरल्याचे दिसले नाही. मंत्र्यांनी राजकीय दौरे करताना इथल्या शेतकऱ्यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

जोरदार पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

loading image
go to top