‘वैद्यनाथ’च्या कर्जाला विभागीय सहनिबंधकांचीही नकारघंटा 

दत्ता देशमुख
Friday, 23 October 2020

  • अध्यक्ष सारडांसह तिघांविरुद्ध पोलिसांत एनसी 
  • विभागीय सहनिबंधकाचेही कर्ज देण्यास नकारादेश 

बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजुरीसाठी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त नोंदवही देण्यास टाळाटाळ केल्यावरून जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्या फिर्यादीवरून बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रभान ठोंबरे व उपव्यवस्थाकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एन. सी. दाखल करण्यात आली; तसेच लातूर येथील सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनीही अकृषी संस्थांना कर्ज देऊ नका, असे आदेश बँकेला दिले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाने १६ कोटी ५६ लाख रुपयांची थकहमी दिली आहे. या कारखान्याने जिल्हा बँकेकडे यंदाच्या हंगामासाठी २५ कोटी रुपयांच्या कर्जमागणीचा प्रस्ताव दाखल केला होता. याकर्जासह रब्बी कर्ज वितरणाचा ठराव घेण्यासाठी ता. १६ ऑक्टोबरला संचालक मंडळाने बैठक आयोजित केली. मात्र, सदर बैठक पुढे ढकलून पुन्हा मंगळवारी झाली. मात्र, या बैठकीत काही संचालकांनी वैद्यनाथच्या कर्जाला विरोध केला. दरम्यान, बैठकीला कोरम पूर्ण नसतानाही घरी जाऊन सह्या करण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर उपनिबंधक श्री. फडणीस यांनी बँकेत जाऊन इतिवृत्त नोंदवहीची मागणी केली. मात्र, त्यांना दिले नाही, अशी तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून वरील तिघांविरुद्ध एन. सी. दाखल झाली. तर श्री. फडणीस यांच्यासह संचालक भाऊसाहेब नाटकर व कैलास नलावडे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून बँकेने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठेवीदारांचे देणे प्राधान्याने द्यावे, पीक कर्ज प्राधान्याने वाटावे व अकृषी संस्थांना कर्ज देऊ नये, असे आदेश दिले आहेत. सहकार व पणन विभागाने नाशिक, उस्मानाबाद आणि बीड या जिल्हा बँकेने अकृषी कर्ज देऊ नये असे आदेश दिले असून, त्याचे पालन करावे, असे म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Vaidyanath Bank case co-registrar refused